Panjim : गणेशोत्सवानिमित्त पणजीत भरणाऱ्या अष्टमीच्या फेरीत स्टॉल उभारणीसाठीच्या इच्छुक विक्रेत्यांवर आज मंगळवारी सायंकाळी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अर्ज घेण्यासाठी मोठी झुंबड उडाल्याने गोंधळ होऊन हा प्रकार घडला. महापालिकेने अर्ज देण्याचे बंद झाल्यानंतर विक्रेते आक्रमक झाले होते. मांडवी तिरावर दि. 17 ते 30 ऑगस्टपर्यंत अष्टमीची फेरी भरणार आहे. त्यासाठी एक आठवडा अगोदर अर्ज विक्री करायची होती, ती झाली नाही. अष्टमीच्या फेरीच्या आदल्या दिवशी अर्ज विक्री ठेवल्याने विक्रेत्यांनी अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी केली होती.
सकाळी सात वाजल्यापासून महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर दक्षिण-उत्तर अशा बाजूला विक्रेत्यांची गर्दी होती. अनेक परराज्यातील विक्रेते रांग लाऊन उभे होते. नेहमीपेक्षा यावेळी दुप्पट स्टॉल उभारणी होण्याची शक्यता होती आणि तसेच झाले. महापालिकेने यावेळी 430 स्टॉलना परवानगी दिली आहे. उद्या, 17 रोजी स्टॉल उभारले जाणार असून, 18 पासून ही फेरी सुरू होईल. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून अर्ज विक्री सुरू झाली, अर्ज घेऊन खाली आल्यानंतर दुसऱ्या विक्रेत्यांना सोडले जात होते. मनपाच्या महिला निरीक्षक, शिपाई व पोलिस या गर्दीवर नियंत्रण ठेवून होते, परंतु सांयकाळी अर्ज देण्याचे बंद होताच रांगेत उभे राहिलेल्या विक्रेत्यांनी गोंधळाला सुरुवात केली. प्रत्येक विक्रेत्यास एक अर्ज दिला असता, तर सर्वांना तो मिळाले असते, असे या विक्रेत्यांचे म्हणणे होते. तर काहीजणांना तीन-चार अर्ज दिल्याचा आरोपही केला.
विक्रेत्यांनी प्रवेशद्वाराजवळ गर्दी केला. त्यात काही माध्यम प्रतिनिधी आल्याने या विक्रेत्यांनी आणखी आरोप करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आयुक्तांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस निरीक्षक पालेकर हे स्वतः पोलिसांना घेऊन महापालिकेच्या दारात आले. काही जणांना लाठीमार केल्यानंतर विक्रेत्यांची पळापळ सुरू झाली आणि महापालिकेसमोरील गर्दी अचानक हटली गेली. सायंकाळपर्यंत सर्वजण रांगेत होते, पण अर्ज विक्री बंद होताच हा गोंधळ उडाला. अशाप्रकारचा गोंधळ प्रत्येक वर्षी होत असतो, पण यावेळी स्टॉलसंख्या वाढविल्याने गर्दी वाढल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.
एकजण ताब्यात
विक्रेत्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केल्यानंतर एक विक्रेता जाब विचारत होता. प्रवेशद्वारावर उभ्या असणाऱ्या पोलिस शिपाई व मनपा शिपायांनी त्याला अडविले. माध्यम प्रतिनिधी असल्याने तो अधिकच तावातावाने बोलू लागल्याने पोलिसांनी त्यालाच पहिल्यांदा ताब्यात घेतले आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली.
36 लाखांचा महसूल मिळणार
मनपाने यावर्षी अष्टमीच्या फेरीसाठी 430 स्टॉलना परवानगी दिली आहे. त्यात 10 चौ. मी. आकाराचे स्टॉल उभारले जाणार असून, त्यासाठी 60 रुपये प्रति चौ. मी. प्रति दिन असे भाडे आकारले जाणार आहे. दि, 17 ते 30 या कालावधीत चौदा दिवस ही फेरी राहणार असल्याने या स्टॉल्सच्या भाड्यापोटी महापालिकेच्या तिजोरीत साधारण 36 लाख 12 हजार रुपये जमा होणार आहेत.
काही मिनिटांत परिस्थिती पूर्ववत
सकाळपासून एक पोलिस, शिपाई आणि महापालिकेचे निरीक्षक तिघेजण या गर्दीवर नियंत्रण ठेवून होते. परंतु सायंकाळ झाल्यानंतर अर्ज देण्याचे बंद केल्यानंतर विक्रेत्यांचे संतुलन हरपले आणि त्यांनी प्रवेशद्वारावर गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच शहर पोलिस स्थानकाचे निरीक्षक निखिल पालेकर हे स्वतः पोलिसांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. विक्रेत्यांचा आक्रमकपणा पाहिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यामुळे विक्रेत्यांची धावपळ सुरू झाली आणि काही मिनिटांत परिसरातील वातावरण पूर्ववत झाले.
पणजी मनपाने यावर्षी अष्टमीच्या फेरीसाठी 430 स्टॉलना परवानगी दिली आहे. 60 रुपये प्रति चौ. मी. प्रति दिन असे भाडे आहे. दि, 17 ते 30 या कालावधीत चौदा दिवस ही फेरी राहणार असल्याने या स्टॉल्सच्या किरायापोटी महापालिकेच्या तिजोरीत साधारण 36 लाख 12 हजार रुपये जमा होणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.