Sunburn Goa 2023: सनबर्नला हायकोर्टाचा दणका! गेल्या वर्षीचा महोत्सव बेकायदेशीर, यावर्षीही कडक निर्बंध

55 डेसिबलच्या खाली ध्वनी मर्यादा पाळावी लागेल, रात्री दहानंतर ध्वनी यंत्रणा बंद करावी लागणार
Sunburn Goa 2023
Sunburn Goa 2023Dainik Gomantak

Sunburn Goa 2023: कोणतेही कायदे व नियम न पाळता बेकायदेशीरपणे हणजुणे येथे ईडीएम चालविणाऱ्या सनबर्नच्या प्रवर्तकांवर आज उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अत्यंत कडक निर्बंध लागू केले.

गेल्यावर्षीचा सनबर्न महोत्सव कोणतीही रितसर मान्यता न घेता आयोजित केला होता, असा निष्कर्ष न्यायालयाने काढल्याने यावर्षीच्या आयोजनासंबंधी त्यांनी ज्या पद्धतीने मान्यता घेतल्या त्यांच्या वैध्यतेविषयीच संशय निर्माण झाला आहे.

ध्वनिप्रदूषणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच काही निर्बंध घालून दिले आहेत. गोव्यात मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात होते. उच्च न्यायालयाने त्याबाबत आता राज्याला खडसावत यापुढे कोणतीही हलगर्जी चालणार नाही स्पष्टपणे नमूद केले.

उच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय अत्यंत अभ्यासपूर्ण तर आहेच, परंतु किनारपट्टीवर रात्री दहानंतरही कर्कश संगीत वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या एकूणच डान्स बार व नाईट क्लबना कायमचे निर्बंध घालून देणारा आहे. अधिकाऱ्यांना तेथे प्रत्यक्ष उपस्थित राहून निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल. पोलिस उपमहानिरीक्षक, प्रदूषण नियंत्रण खाते व संबंधित ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सनबर्नच्याच ठिकाणी उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

55 डेसिबलच्या खाली ध्वनी मर्यादा पाळावी लागेल, रात्री दहानंतर ध्वनी यंत्रणा बंद करावी लागेल असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले असून त्याची प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना महोत्सव स्थळी हजर राहण्याचा आदेश देण्यात आले आहेत.

गेल्यावर्षी रात्री दहानंतरही सनबर्नने संगीत चालू ठेवले होते. त्याची मखलाशी करताना महोत्सव स्थळ 55 हजारांपेक्षा अधिक लोक उपस्थित आहेत, त्यांना आम्ही थोपवून धरू शकत नाही असा दावा आयोजकांनी केला होता, परंतु यावर्षी उच्च न्यायालयाने स्पष्ट निकष घालून दिल्याने महोत्सवात रात्री दहानंतर संगीत वाजणार नाही हे उपस्थितांना आधीच नमूद करावे लागणार आहे.

निकष न पाळताच घेतल्या होत्या मान्यता

गेल्यावर्षी २०२२ साली सनबर्नच्या आयोजकांनी बेकायदेशीररीत्या महोत्सव आयोजित केला होता है आजच्या निकालातून समोर आले आहे. त्यांनी घेतलेल्या मान्यता योग्य निकष न पाळता घेतल्या होत्या, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com