

पणजी: श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात केवळ धोंडांनाच प्रवेश असेल, असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, २१ ते २५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या या जत्रोत्सवात सर्व भाविक-भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री लईराई देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यंदा दर्शनासाठी धोंड आणि भाविकांसाठी स्वतंत्र रांगा असतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी भास्कर गावकर, आतिश गावकर, दयानंद गावकर, महादेव गावकर, संजय गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गावकर म्हणाले की, गेल्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जत्रा सुरळीत पार पडावी यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची योग्य ती काळजी घेत नागरिकांनी जत्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
दुकानांवरही मर्यादा
जत्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आणि उच्चस्तरीय समितीने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्वतः उपस्थित राहून आयोजनाची पाहणी व मार्गदर्शन केले असून त्यांचे पूर्ण सहकार्य लाभले आहे.
जत्रेच्या पहिल्या दिवशी होमखंडा शेजारी ९ आणि मंदिराच्या मागे २५ दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या दिवसापासून होमखंडा परिसरात २५ आणि मंदिराच्या मागे ३५ दुकाने उभारण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.
धोंडगण, भाविकांसाठी नियम : जत्रेदिवशी सकाळी पूजा व इतर विधी पार पडल्यानंतर दुपारी १२ वाजता श्री माया केळबाय पंचायतनाचे (मयेकार) चौगुले आणि श्री खेतोबा देवस्थानचे (वांयगणकार) आगमन झाल्यानंतर पुढील धार्मिक विधींना सुरुवात होते. अग्निदिव्य, स्नान आदी विधींच्या कालावधीत धोंडगणांनी आपल्या कुटुंबियांसह न राहता वेगळे राहावे, जेणेकरून धार्मिक विधींमध्ये अडथळा निर्माण होणार नाही आणि गर्दीही टाळता येईल. धोंडगणांच्या सहकार्यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले काही निर्णय
श्री लईराई देवस्थानापासून मूळस्थान श्री महामाया लईराई मंदिर (मुड्डेर) पर्यंत सुमारे १५ लाख रुपये खर्चून ९२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी ज्या उतरंडीवर दुर्घटना घडली होती, ती उतरंड काढून जागा सपाट करण्यात आली आहे.
वीज खात्याद्वारे सर्वत्र दिवे लावण्यात आले असून रस्ते रुंद करण्यात आले आहेत.
मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही.
पोलिस, अग्निशमन, आरोग्य व इतर आपत्कालीन यंत्रणा सज्ज असतील. यासोबत १०० स्वयंसेवक धोंडगण व भाविकांच्या मदतीसाठी तैनात असतील.
वाहनांच्या पार्किंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.