Online Fraud in Goa : केवायसीच्या नावाखाली फातोर्ड्यातील एका महिलेला लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. एसबीआय या नामांकित बँकेचा कर्मचारी असल्याचं भासवत तोतयाने महिलेचे तब्बल 10.53 लाख लुटले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात तक्रार दाखल केली असून तपास सुरु केला आहे.
फातोर्ड्यातील एका महिलेची लाखोंची फसवणूक झाल्यामुळे तिने पोलिसात धाव घेतली. एका अज्ञात व्यक्तीने एसबीआय या बँकेचा कर्मचारी असल्याचं भासवत महिलेला केवायसी करण्यास सांगितलं. केवायसीच्या बहाण्याने महिलेच्या खात्यातील सुमारे 10.53 लाख रुपये भामट्याने आपल्या खात्यावर वळते केले. जेव्हा महिलेला याबद्दल संशय आला तेव्हा तिने पोलीस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत महिलेने दिलेल्या वर्णनाप्रमाणे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान नुकतीच एका नामांकित कंपनीची डिलरशिप देण्याचे आमिष दाखवून 12.75 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी सांताक्रुझ येथील एका कंपनीने सायबर क्राईम पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
आयटीसी कंपनीचा कर्मचारी असल्याची बनावट ओळख दाखवून संशयिताने तक्रारदाराला ऑनलाईन गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुझ येथील एका कंपनीला एका व्यक्तीने आपण आयटीसी कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच कंपनीला डिलरशिप मिळवून देतो पण त्यासाठी काही रक्कम आगाऊ ऑनलाईनद्वारे द्यावी असेही सांगितले. तक्रारदाराने त्याच्यावर विश्वास ठेवला व संशयित जशी रक्कम मागत होता, तशी ऑनलाईन त्याला दिली.
सुमारे 12.75 लाखांची रक्कम देऊनही डिलरशिप मिळत नसल्याने तक्रारदाराला संशय आला. त्याने आयटीसी कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन पाहणी केली असता तेथे या कंपनीने सावधानतेचा इशारा देताना ‘काही व्यक्ती कंपनीचे नाव तसेच ब्रँड वापरून बनवेगिरी करत आहेत’ असे नमूद केले होते. तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने तक्रार दाखल केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.