‘कचरा’ प्रकल्पावरून कुडचिरे गावात पेटलेला वाद तूर्त शांत झाला असला, तरी या वादाची धग मात्र कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत गावात ‘कचरा’ प्रकल्प उभारण्यास देणार नाही, असा कडक पवित्रा स्थानिक लोकांनी घेतला आहे.
काँग्रेससह भाजपविरोधी अन्य पक्षांनी आता कुडचिरेवासियांना पाठिंबा दर्शवला आहे. काल (गुरुवारी) रात्री कुडचिरे येथे एक जाहीर सभा घेण्यात आली. नियोजित प्रकल्पाबाबतीत निश्चित माहिती समोर येत नाही. तोपर्यंत संघर्ष चालूच ठेवण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. याप्रश्नी खास ग्रामसभा घेण्याची मागणीही पुढे करण्यात आली. या बैठकीस कुडचिरेवासियांनी शक्तीप्रदर्शन घडविले. कुडचिरे येथील बाराजण देवस्थान परिसरात प्रकल्प उभारण्याच्यादृष्टीने सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ''कन्स्ट्रक्शन अँड डॅब्रीज'' प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
तर ''कन्स्ट्रक्शन अँड डॅब्रीज'' प्रकल्पाच्या नावाखाली गावात कचरा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचा लोकांचा दावा आहे. या प्रकल्पासाठी काल (गुरुवारी) पोलिस बंदोबस्तात भू-सर्वेक्षण करताना लोकांनी त्यास विरोध केला. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कुडचिरे गावात कोणत्याही प्रकल्पाला मान्यता देवू नये, अशी मागणीही अमित पाटकर यांनी केली.
‘कचरा’ प्रकल्पावरून कुडचिरे गावात तणाव निर्माण झाल्यानंतर काँग्रेसतर्फे काल रात्रीच कुडचिरे येथील श्री सातेरी मंदिरात एक जाहीर सभा घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीस कुडचिरेवासियांच्या शक्तीप्रदर्शनाचे दर्शन घडले. या बैठकीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, ऍड. जितेंद्र गावकर, ऍड. अजय प्रभूगावकर, मेघ:श्याम राऊत, वितेंद्र शिरोडकर, नझीर बेग यांच्यासह गोवा फॉरवर्डचे संतोष सावंत उपस्थित होते. लोकांना अंधारात ठेवून प्रकल्प उभारण्याच्या हालचाली झाल्यास काँग्रेस ठामपणे लोकांच्या पाठीशी उभे राहणार, असे अमित पाटकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.