Goa Food Court कुडचडे काकोडा पालिकेच्या आज झालेल्या विशेष बैठकीत 33 फूडकोर्ट व जी सुडा मार्केटमधील 56 प्लॅटफॉर्मसाठी इ निविदा काढण्यात येणार असून फूडकोर्टसाठी प्रत्येकी दहा हजार महिना तर प्लॅटफॉर्मसाठी दीड हजार महिना दर आकारणीसाठी मंडळाने ठराव घेतला.
पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात उदघाटन करण्यात आलेल्या फूडकोर्टमध्ये गाडेधारकांना कधी सामावून घेणार याची वाट पहात आहेत. या फूडकोर्ट समोर दहा रस ऑम्लेट व पाणीपुरी गाडेधारक असून चार दीनदयाळ योजनेचे गाडे आहेत. या फूडकोर्टचे उदघाटन झाल्याने हे गाडेधारक नवीनच उभारण्यात आलेल्या फूडकोर्टमध्ये जाण्याची वाट पाहात आहेत.
फूडकोर्टचे उदघाटन झाल्यानंतर पर्यटन खात्याने सदर फूडकोर्टचा ताबा कुडचडे पालिकेकडे दिला असल्याने आता त्यांचे भाडे दर दिवशी की दर महिना अकरावे या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा झाली यावेळी बहुतेक नगरसेवकांनी दर महिना भाडे आकारणीवर शिकामोर्तब केले.
यावेळी सदर फूडकोर्ट व जी सुडा मार्केटमधील प्लॅटफॉर्मचे दर महिना भाडे व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फूडकोर्टसाठी कमीत कमी महिना दहा हजार तर प्लॅटफॉर्मसाठी दीड हजार भाडे आकारण्यात यावे व हे काम पालिकेला परवडणार नसल्याने ते खाजगी कंत्राटदाराला द्यावे व यासाठी इ निविदा काढणार असल्याचे नगराध्यक्ष जासमीन ब्रागंझा यांनी सांगितले.
''कुडचडे बाजारात व्यवसाय कसा होतो हे एकाही नगरसेवकाला माहिती नसल्याने सदर भाडे आकारणीविषयी काही व्यावसायिकांचा सल्ला घेतला असता तर चांगले झाले असते'', असे बाळकृष्ण होडरकर यांनी सांगितले. सध्या जो दर ठरवण्यात आले आहेत ते पालिका मंडळाच्या मान्यतेने ठेवले असून फूडकोर्टसाठी सर्व खर्च मिळून कमीत कमी साडे बारा हजार पर्यंत भाडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या जे दहा ऑम्लेट व पाणीपुरी गाडे धारक व चार दीनदयाळ योजनेचे गाडे आहेत त्यांना फूडकोर्टमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्याधिकारी मनोहर कारेकर यांनी सांगितले. महिनाकाठी जे भाडे आकारण्यात येणार आहे त्यात या गाडेधारकांसाठी किती सूट द्यावी याविषयी आज काहीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.