
पणजी: पणजी बसस्थानकावर सोमवारी (दि.८) झालेल्या इलेक्ट्रिक बस अपघातानंतर कदंब परिवहन महामंडळ (KTC) आक्रमक झाले आहे. महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी एक कठोर निवेदन जारी केले असून, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
सोमवारी पणजी बसस्थानकात एका १२ मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक बसने एका महापालिका शेड आणि बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या एका टेम्पोला धडक दिली होती. या अपघातातील बसचालक नशेत होता की नाही, याची पुष्टी तुयेकर यांनी केली नसली तरी, अशा प्रकरणांमध्ये महामंडळ काहीच ऐकून घेणार नाही असे त्यांनी सांगितले. “जेव्हा ५० लोक बसमध्ये बसतात, तेव्हा त्यांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी केटीसीची असते. सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे,” असे ते म्हणाले.
चालकांच्या वर्तनावर कठोर लक्ष ठेवण्यासोबतच, तुयेकर यांनी सांगितले की महामंडळ प्रवाशांकडून होणारी भाडेचोरी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांची नोंद न करण्याच्या प्रकारांवरही कठोर कारवाई करत आहे. “येत्या सहा महिन्यांत केटीसीच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे,” असेही त्यांनी सांगितले.
केटीसीच्या ताफ्याला अधिक बळ देण्यासाठी ५० नवीन ई-बसेससाठी निविदाकाढण्यात आल्या आहेत आणि मागील ऑर्डरमधून आणखी ३० ई-बसेस लवकरच येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एकूण ८० नवीन बसेस ताफ्यात सामील होतील. “२०२७ पर्यंत, आम्ही २०० जुन्या बसेस टप्प्याटप्प्याने मोडीत काढून त्यांच्या जागी नवीन बसेस आणण्याची योजना आखली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुयेकर यांनी 'म्हाजी बस' योजनेअंतर्गत खासगी ऑपरेटरसोबत सेवा एकत्र करून 'लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी' सुधारण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे सांगितले. यामुळे राज्याच्या सर्व भागांमध्ये बस सेवा अधिक प्रभावी होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.