ज्येष्ठ साहित्यिक आणि कोंकणी भाषेसाठी काम करणारे, कोंकणी भाषेला प्रोत्साहन देऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारे पुंडलिक नाईक यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने गोमंतक टीव्हीसाठी सल्लागार संपादक शैलेंद्र मेहता यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमद्धे त्यांनी आपला जीवन प्रवास व्यक्त केला.
आजवरच्या आयुष्यात साहित्यासाठी मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. या प्रवासादरम्यान अनेक प्रतिभावान लोकांचा सहवास मला लाभला; ज्यामुळे माझे साहित्य लोकांपर्यंत पोहोचू शकले. सुरुवातीला मी सर्व साहित्य प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि बालसाहित्यापासून सुरुवात करून नंतर नाटक, कथा-कादंबरी या सर्व प्रकारांमध्ये काम केले, असे मत पुंडलिक नाईक यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, कोंकणी साहित्य लोकांपर्यंत पोहोचत आहे याचा मला आनंद आहे पण दुसरीकडे कोंकणी साहित्यकार कमी असल्याची खंतही वाटते. अनेक लेखक हे भौतिक सुखवस्तू गोष्टींमध्ये अडकलेले दिसून येतात. आपल्या साहित्यापेक्षा त्यांना भौतिक गोष्टींचा, कपडे-गाडी यांचा मोह असलेला दिसून येतो. फक्त साहित्यामध्ये भर घालण्यासाठी साहित्य नको, तर भाषेसाठी निष्ठा असावी. आणि यासाठी साहित्यकारांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
कोंकणी राज्यभाषा होणे पुरेसे नाही तर राज्यभरात होणारे सर्व व्यवहार हे कोंकणी भाषेतच व्हावेत. सर्व सभा, जाहीरनामे, सरकारी कामकाज हे कोंकणीत होणे अपेक्षित आहे; आणि याची जबाबदारी आत्ताच्या नव्या पिढीवर, नव्या सरकारवर आहे.
लेखक, साहित्यकरांची महत्वाची भूमिका
आपली भाषा पुढे नेण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती लेखक आणि साहित्यकार यांची. त्यांच्या खांद्यावर समाजात घडणाऱ्या गोष्टींचे ओझे आपसूकच येत असते. आणि त्या गोष्टी आपल्या लेखणीतून मांडणे हे लेखकांचे कर्तव्य आहे. समाजातील घडणाऱ्या घटना लेखणीमार्फत लोकांपर्यंत पोचवण्याची तडफड लेखकांमध्ये आणि प्रत्येक साहित्यकारांमध्ये असली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक साहित्यकार हा संवेदनशील असला पाहिजे.
कोंकणी इतर प्रांतांमध्येही पोहोचण्याची गरज...
आपली कोंकणी भाषा ही फक्त आपल्या राज्यापुरती मर्यादित न राहता इतर प्रांतांमध्ये ही पोहोचली पाहिजे. तरच आपल्या भाषेचा दर्जा उंचावेल. कोंकणी इतर भाषांमध्ये रूपांतरित झाली पाहिजे आणि यासाठीच आपणच संघर्ष करण्याची गरज आहे. याची सर्वात मोठी जबाबदारी इथल्या साहित्यकारांवर आहे.
बदलत्या तंत्रज्ञानानुसार लेखकांनी ‘अपडेट’ होण्याची गरज
दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल घडत असतात आणि असेच बदल साहित्य प्रकारांमध्ये सुद्धा करत असतात. पूर्वीचे साहित्यप्रकार आणि आत्ताचे साहित्यप्रकार यामध्ये जमीन- आसमानाचा फरक आहे. कथांमध्ये नवे बदल होत असतात, नाटकांमध्ये नवे प्रयोग, नवे बदल होत असतात; त्याचप्रमाणे सिनेमाच्या लेखनामध्ये तर सतत अनेक बदल होत असतात. म्हणून नव्या तंत्रज्ञानाशी सर्व लेखकांनी जुळवून घेणे ही काळाची गरज आहे. लेखक हा नेहमी काळानुसार ‘अपडेट’ असला पाहिजे.
असे असावे कोंकणीचे भविष्य...
भविष्यासाठी लेखकांनी आपला दृष्टिकोन वाढवून सतत नव्या विषयांच्या शोधात राहिले पाहिजे. गोव्याची लोककला, गोव्याचा ग्रामीण भाग व संस्कृती हे विषय आता जुने झाले असून सध्या घडणाऱ्या गोष्टी लेखकांनी हेरल्या पाहिजेत. नवीन विषय शोधून काढले पाहिजे, नव्या आव्हानांना त्यांनी स्वीकारले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांचे आपल्या साहित्यावरील आणि कोंकणी भाषेवरील प्रेम त्यांच्या संवादातून स्पष्ट दिसून येत होते. आपल्या धारदार लेखणीतून गोवेकरांना जागे करणाऱ्या, अत्यंत प्रतिभावान, हुशार, संवेदनशील आणि तरुणांसाठी प्रेरणास्थान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक नाईक यांना गोमंतकचा सलाम!
मुलाखत : शैलेंद्र मेहता (सल्लागार संपादक, गोमंतक टीव्ही)
शब्दांकन : काव्या पोवार (मल्टीमीडिया प्रोडुसर, गोमंतक टीव्ही)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.