Goa Drama : फ्लॅशबॅक तंत्राने फुलविलेली गाथा ‘तुदू इस्ता बॅ’; स्पर्धची रंगत वाढली

Goa Drama : उत्तम अभिनय, दिग्दर्शनामुळे मनाला भिडणारा नाट्याविष्कार
Goa Drama
Goa DramaDainik Gomantak

Goa Drama :

गेले तीन-चार दिवस सुमार कलाकृती पाहून वैतागलेल्या प्रेक्षकांना नागेश कला मंच नागेशी-फोंडा या संस्थेने सादर केलेल्या ‘तुदू इस्ता बॅ’ या कलाकृतीने बराच दिलासा दिला.

कडक उन्हामुळे वैतागलेल्याला पावसाची पहिली सर पडल्यावर कसे वाटावे, तसे रसिकांना वाटले. ‘तूदु इस्ता बॅ’ सारखे कोणाला पचनी न पडणारे नाव नाटकाला का द्यावे लागले हे मात्र समजले नाही. मूळ संहिता सई परांजपे यांची.

तिचे कोकणीत रूपांतर केले आहे, ते वैभव कवळेकर यांनी. वैभव म्हणताच आठवते ते नुकतेच स्पर्धेत सादर झालेले त्यांचे ‘रंगखेव’ हे वेगळ्या धाटणीचे नाटक. प्रस्तुत अनुवादित नाटकावरही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

तीन कैद्यांची ही कथा. त्यातला सदा हा कैदी आपल्या व्यभिचारी बायकोचा खून करून तुरुंगात आला आहे तर नंदू यांनी सुपाऱ्या घेऊन अनेकांना यमसदनी पाठवल्यामुळे त्याला तुरुंगात यावे लागले आहे. नुकताच आलेला तिसरा कैदी बाप्पा हा मास्तर असून आपल्या आंधळ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला मारल्यामुळे जेलमध्ये आला आहे. वास्तविक तो खून बाप्पाची मुलगी गुलाब ही आपली अब्रू वाचवण्याकरता करते.

पण तिला वाचवण्याकरता बाप्पा तो आळ आपल्यावर घेतात आणि शिक्षा भोगण्याकरता तुरुंगात येतात. आता ज्या घटना या तीन कैद्यांच्या आयुष्यात घडल्या आहेत. त्या सर्व घटना ‘फ्लॅशबॅक’ तंत्राने दाखविण्यात आल्या आहेत.

आणि हे तंत्र हेच या नाटकाचे बलस्थान ठरले आहे. गुलाबवर होणारा बलात्कार, सदाची बायको सोनियाचा पर पुरुषाबरोबरचा व्यभिचार व नंतर तिचा झालेला खून, नंदूच्या वडिलांचा मृत्यू, यासारखे प्रसंग फ्लॅशबॅक तंत्राने सादर करून नाटकाला एक वेगळाच आयाम प्राप्त करून दिला आहे.

नाटकाच्या शेवटी दोघेही कैदी जेलच्या बाहेर येतात,तिसरा नंदू याला फाशी होते. सदाच्या शिक्षेचा काळ संपतो. आणि गुलाबाने आपण खून केला, अशी कमिशनरकडे कबुली दिल्यामुळे बाप्पाची तुरुंगातून मुक्तता होते.

पण त्याच बरोबर या तिघांत निर्माण झालेले अतूट नाते अधोरेखित करण्यात दिग्दर्शक चांगलेच यशस्वी ठरले आहेत. बीए बीएड असलेला सदा सुटकेनंतर बाप्पाच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करण्याचे तसेच बाप्पांची आंधळी मुलगी गुलाब हिच्याशी लग्न करण्याचे ठरवतो, तर फाशी झालेला नंदू आपल्या इच्छापत्रात आपले डोळे अंध गुलाबला दान करून जातो.

आणि हे सगळे पाहून भावनाप्रधान झालेला बाप्पा प्रार्थना म्हणत जेल सोडतो. संपूर्ण नाटक प्रामुख्याने तीनच कलाकारांभोवती फिरत असल्यामुळे या नाटकाचा डोलारा हा या तीन कलाकारांवर होता. आणि बाप्पा झालेले देवराज गावडे, सदा झालेले केवल नाईक व नंदू झालेले विभव गावडे यांनी अभिनय कौशल्याचे परिपूर्ण प्रात्यक्षिक दाखवून त्रिवेणी संगम साधला. त्यांचा मुद्राभिनयही वाखणण्यासारखाच होता.

Goa Drama
Water Issue In Goa: मुबलक पाणी मिळणार; पण कमीत कमी दोन वर्षे तरी वाट पहावी लागणार..

खास करून बाप्पा झालेल्या देवराज यांनी बोलताना एक वेगळाच हेल काढत व संवाद फेकीचे टायमिंग साधत मास्तर समर्थपणे उभा केला. विभव गावडे यांनी नंदूची आक्रमकता योग्यरित्या दाखविली. पत्नीचा खून करतानाची सदाची मानसिकता नाईक यांनी परिपूर्णतेने रंगवली. या तिघांच्या मानाने इतर भूमिका नगण्यच होत्या. या तिघांच्या अभिनयाला कोंदण मिळाले ते गौतम गावडे यांच्या दिग्दर्शनाचे.

संपूर्ण नाटक हे जेलच्या सेटवर होत असल्यामुळे दिग्दर्शन आव्हानच होते. आणि हे आव्हान गौतमने यशस्वीरित्या पेलले असेच म्हणावे लागेल. एका कैद्याचा फ्लॅशबॅक दाखवताना दुसऱ्या कैद्यांना योग्य मूव्हमेंटस देणे, तीनही कैद्यांचे एकत्रित घेतलेले प्रसंग, गुलाबवरचा बलात्कार वा लिनाचा व्याभिचार यासारखे प्रसंग त्यांनी सफाईदारपणे घेऊन नाटकाला एक वेगळाच आकार प्राप्त करून दिला.

मुख्य म्हणजे नाटकात केवळ तीन प्रमुख पात्रे असूनही नाटक कोठेच रेंगळणार नाही, वा कंटाळवाणे होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेतली. त्यांची स्वतःचीच प्रकाशयोजना असल्यामुळे ते अनेक प्रसंग केवळ सुबक प्रकाश योजनेद्वारा सजीव करू शकले. सुरजित च्यारी यांचे नेपथ्यही पूरक असेच होते.

एका भागात जेल तर दुसऱ्या भागात फ्लॅशबॅक असे विभाजन केले होते. आणि प्रकाशयोजनेचा योग्य वापर केल्यामुळे प्रसंग परिणामकारक होऊ शकले. यातील प्रतिकात्मक प्रसंग तर केवळ सुयोग्य प्रकाशयोजनेमुळेच खुलू शकले.

अभिनय,दिग्दर्शन, प्रकाशयोजनेचा मिलाफ

या नाटकातील तोट्याची बाजू म्हणजे स्त्रीपात्रांच्या नगण्य भूमिका. यात तीन स्त्री पात्रे आहेत. पण या तीनही भूमिका तोंडी लावण्यापुरत्याच आहेत. स्पर्धेच्या दृष्टीने ही गोष्ट मारक ठरू शकते. पण दिग्दर्शन, अभिनय व प्रकाश योजना यांच्या मिलाफाने जी एक बेजोड कलाकृती उभी राहिली, तिला दाद द्यायलाच हवी.

विशेष म्हणजे यात बाकीबाब बोरकरांच्या काही मराठी कवितांचाही समावेश करण्यात आला आहे. ज्या प्रार्थनेने नाटकाचा शेवट होतो, ती प्रार्थनाही मराठीतच आहे. पण या कविता व प्रार्थना नाटकात कोठेही विसंगत वाटत नाहीत, हेही तेवढेच खरे. एकंदरीत मागच्या तीन-चार नाटकांमुळे घसरलेला स्पर्धेचा दर्जा या नाटकाने पुन्हा उंचावून रंगत वाढवली हे निश्चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com