Konkan railway police arrested 4 accused in connection with gold robbery : एकाने माहिती मिळवायची, दुसऱ्याने टेहळणी करायची आणि त्यानंतर तिसऱ्याने रेल्वेतून सोने घेऊन जाणाऱ्या प्रवाशाचा पाठलाग करून वाटेत त्याचे सोने लुटायचे अशी वेगळीच पद्धती अवलंबणाऱ्या एका आंतरराज्य टोळीतील चारजणांना कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे सोने, 50 हजार रुपये रोख आणि दोन गाड्या जप्त केल्या आहेत.
मुंबईहून केरळला रेल्वेतून सोने घेऊन जाणाऱ्या लोकांना हेरून ते झोपेत असताना या टोळीतील सदस्य सोने लुटायचे. या चार संशयितांना कोकण रेल्वे पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत सांगली व मुंबई येथे जाऊन अटक केली. या कामगिरीबद्दल कोकण रेल्वेचे पोलिस अधीक्षक गुरुदास गावडे यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
अटक केलेल्या संशयितांची नावे संदीप भोसले (४०, कवठे महांकाळ, सांगली), अक्षय चिनवळ (२८, खानापूर-बेळगाव), अर्चना मोेरे (३२, तळोजा-मुंबई) आणि धनपत बैद (४४, पूर्व परळ - मुंबई) अशी असून महाराष्ट्र व कर्नाटकात जाऊन केलेल्या कारवाईत या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
यासंबंधात माहिती देताना, कोकण रेल्वे पोलिसांचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी सांगितले की, २ मे २०२३ या दिवशी ‘हमसफर’ सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीने मुंबईहून केरळमध्ये सोने घेऊन जाणाऱ्या अशोक आर. (५५, नागपाडा-मुंबई) याला हेरून त्याच्याकडे सात किलो साेने असलेली सुटकेस पळवून सुमारे चार कोटींच्या ऐवजावर डल्ला मारला होता.
भोसले व चिनवळ या दोघांनी त्याचा पनवेलहून पाठलाग केला होता. पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास अशोक हा गाढ झोपेत असताना या दोघांनी काणकोण येथे ही गाडी पोहोचल्यावर सोन्याची बॅग चोरून काणकोण क्रॉसिंगजवळ गाडी थांबलेली असताना बाहेर उडी टाकून पळ काढला होता.
यासंदर्भात सुरवातीला पोलिसांना कुठलाही धागादोरा न सापडल्याने हा तपास रेंगाळला होता. मात्र, पोलिसांनी संपूर्ण रेल्वे मार्गाचा सर्व्हेलन्स तपास केला असता सांगली येथील दोन व्यक्तींचा या चोरीत हात असण्याची शक्यता त्यांना दिसून आली.
उपअधीक्षक कदम आणि कोकण रेल्वे पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुनील गुडलर यांनी सांगलीत जाऊन भोसले व चिनवळ या दोघांना अटक केल्यानंतर मुंबईत असलेल्या त्यांच्या अन्य दोघा साथीदारांची त्यांना माहिती मिळाली.
त्या दोघांना मुंबईत जाऊन अटक करून गाेव्यात आणल्यानंतर त्यांना काणकोण न्यायालयासमोर हजर केले. तेथे त्यांना चार दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड देण्यात आला.
अर्चनाने टीप दिल्यानंतर लूट
केरळमधील सोनाराकडे अशोक हा सोने घेऊन जाणार याची माहिती अर्चना मोरे हिला धनपत बैद याने दिली. त्यानुसार अर्चनाने सांगलीतील अक्षय चिनवळ व संदीप भोसले यांच्याकडे संपर्क साधला.
1 मे रोजी सायंकाळी अशोक सोनाराच्या दुकानातून सोने घेऊन निघाला होता. अक्षय व संदीप त्याच्या पाठोपाठ होते. तो ज्या गाडीत चढला त्याच्या मागोमाग तेही चढले आणि काणकोण येथे पोहोचल्यावर त्याच्याकडील सोने लुटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.