कोकण : गोवा किनारपट्टीपासून सुरू झालेला पावसाचा जोर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण, मुंबईपर्यंत धडकला. संपूर्ण गोव्यात गेल्या तेरा दिवसांपासून पावसाची संततधार (Heavy Rain in Konkan) सुरूच होती. गुरुवारी पावसाचा जोर अधिक होता. पहाटेपासून ढगफुटीगत पाऊस पडत होता. नदी, नाले तुडुंब भरले असून धरणांचीही पातळी वाढली आहे. तिळारी धरण (Tilari Dam) भरल्यामुळे जलविसर्गाचा (Water overflow due to flood) धोका असल्याने डिचोली, बार्देश, पेडणे तालुक्यातील शापोरा नदीकाठच्या लोकांत घबराट पसरली आहे. दरम्यान, वेधशाळेने गोव्यात उद्या रेड अलर्ट (Red alert) जाहीर केला आहे. गोव्यातील पणजी शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हापसा - पणजी महामार्गावर गिरी परिसरात रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
सिंधुदुर्ग किनारपट्टी परिसराला झोडपले
गोव्याबरोबरच सिंधुदुर्गातही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सिंधुदुर्गातील अनेक ठिकाणी शेती, बागा, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. लोकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर व आजूबाजूच्या परिसराला दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. बांदा शहराला लागून असलेल्या तेरेखोल नदीने धोक्याची पातळी अचानक ओलांडली. त्यामुळे बांदा शहरातील आळवाडा, निमजगा परिसरात नदीचे पाणी घुसल्याने येथील अनेक छोटी मोठी घरे व इमारती पाण्याखाली गेल्या. आळवाडा हा परिसर बांद्याच्या बाजाराचा मुख्य भाग असल्याने तेथे अचानक पाणी आल्याने स्थानिक तसेच दुकानदारांची तारांबळ उडाली. आज सावंतवाडी बांदा मार्गावर असलेल्या इन्सुली गावातील शेतीच्या मळ्यांमध्ये पाणी वाढल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. ग्रामीण भागात ग्रामीण भागातील ओहोळ, नाले, ओसंडून वाहू लागल्याने बऱ्याच ठिकाणी तळ्याचे स्वरूप आले. काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी घराची भिंत कोसळण्याच्याही घटना घडल्या. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांची गैरसोय झाली.
चिपळूणला सर्वाधिक फटका
पावसाचा सर्वांत जास्त फटका बसला असेल, तो म्हणजे चिपळूण शहराला. चिपळूण शहर जवळपास पाण्याखाली गेले. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बसस्थानक, चिंच नाका, मार्कंडी, बेंदेकर आळी, भोगळे, परशुराम नगर या सर्वच परिसरात पुराचे पाणी घुसले. बसस्थानक परिसरात एसटीच्या टपापर्यंत पाणी पोहोचले होते. रॉयल नगर व राधा- कृष्णनगरमधील घरांमध्ये पाणी घुसले. छोटी मोठी वाहने पाण्याखाली गेली. पावसामुळे संपूर्ण कोकणात हाहाकार माजला. शुक्रवारीसुद्धा पावसाचा जोर असाच राहिला, तर परिस्थिती आणखी बिकट होईल. पुराचे पाणी घरात घुसलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पूरस्थितीवर शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.