पणजी: कोलकाता येथे युवा महिला डॉक्टरचा बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ तसेच त्या डॉक्टरला न्याय मिळावा, यासाठी देशभरासह गोव्यातही आरोग्य क्षेत्रही एकवटले. मात्र असे असले तरी डॉक्टरांनी गोमेकॉतील सेवेवर त्याचा फारसा परिणाम जाणवू दिला नाही.
गोमेकॉतील बाह्यरुग्ण विभाग आज सुरू नसणार याचा गवगवा काल समाजमाध्यमांवर झाल्याने गोमेकॉसह म्हापसा व मडगावातील जिल्हा इस्पितळात बाह्यरुग्ण संख्या अत्यल्प होती. वरिष्ठ डॉक्टर व सल्लागार डॉक्टर सेवा देत होते. प्राथमिक आरोग्यकेंद्रांतील आरोग्य सेवा मात्र काही प्रमाणात प्रभावित झाली होती.
गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले की, गोमेकॉत दिवसातून दोन वेळा रुग्णांची होणारी नियमित तपासणीही करण्यात आली. तातडीच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. गोमेकॉच्या एकाही विभागाचा बाह्यरुग्ण विभाग आज बंद राहिला नाही. रुग्णसंख्या मात्र कमी होती,
दरम्यान, आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत येणारी जिल्हा इस्पितळे, उपजिल्हा इस्पितळे, कुटिर रुग्णालये, प्राथमिक आरोग्यकेंद्रे व ग्रामीण दवाखान्यांत रुग्णसेवा काही प्रमाणात प्रभावित झाली.
गोवा निवासी डॉक्टर संघटनेनेही आज आंदोलन करत महिला डॉक्टरांवर झालेल्या अत्याच्याराविरोधात आवाज उठविला. यावेळी बोलताना संघटनेचे प्रतिनिधी डॉ. गावस म्हणाले, आम्ही गोमेकॉतील कोणत्याही आपत्कालीन सेवा बंद न करता न्यायासाठी रस्त्यावर उतरलो आहे. ‘गोमेकॉ’त आज आपत्कालीन स्थितीतील चार सिझेरियन शस्त्रक्रिया; इतर १० तातडीच्या शस्रक्रिया रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी दिली.
डॉक्टर म्हणून आम्ही रुग्णसेवा देण्यास प्राधान्य देतो. सदोदित रुग्णांचा विचार प्रथम करतो. त्यामुळे आज एक दिवस ओपीडी बंद केली असली तरी आपत्कालीन सेवा सुरूच ठेवली. ‘आयएमए’ केंद्रीय समितीच्या निर्देशानुसार रविवार सकाळी ६ पर्यंत ओपीडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील निर्णय चर्चा करून घेण्यात येईल.
डॉ. संदेश चोडणकर, ‘आयएमए’ गोवा प्रमुख
गोमेकॉत ८०० रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर आज वरिष्ठ डॉक्टरांनी उपचार केले. दिवसातून दोन वेळा रुग्णांची होणारी नियमित तपासणीही करण्यात आली. तातडीच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. गोमेकॉच्या एकाही विभागाचा बाह्यरुग्ण विभाग आज बंद राहिला नाही. रुग्णसंख्या मात्र कमी होती, तरीही सल्लागार डॉक्टरनी बाह्यरुग्ण सेवा सुरू ठेवली.
डॉ. शिवानंद बांदेकर, गोमेकॉचे अधिष्ठाता
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.