
हरमल: गोव्यातील हरमल समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या अवाजवी वर्तनाचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका होडीच्या जागेवरून सुरू झालेल्या किरकोळ वादामुळे शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर पर्यटकांनी स्थानिक मच्छिमाराला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मांद्रे पोलिसांनी तातडीने कारवाई करत महाराष्ट्रातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली, तर उर्वरित चार जणांना कोल्हापूरमधून ताब्यात घेण्यात यश आले आहे.
ही घटना ३ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. हरमल येथील खालचावाडा भागातील ४० वर्षीय लॉरेन्स फर्नांडिस हे आपली होडी सावलीत नेण्यासाठी बाजूला सरकवत होते. त्यावेळी होडीजवळ बसलेल्या काही पर्यटकांनी यावरून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, पण काही वेळातच पर्यटकांनी लॉरेन्स यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला.
लॉरेन्स फर्नांडिस यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सौरभ वाळेकर (वय २४) आणि सागर झळके (वय २५) या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे हरमल परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लॉरेन्स फर्नांडिस यांच्या तक्रारीची दखल घेत मांद्रे पोलिसांनी ४ जून रोजी पहाटे १.१९ वाजता तातडीने कारवाई केली. पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५२, ११८(१), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर सौरभ वाळेकर आणि सागर झळके यांना घटनास्थळावरूनच अटक करण्यात आले. मात्र, इतर चार आरोपी पळून गेले होते.
फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पथके रवाना केली. पोलिसांनी केलेल्या कौशल्याने आणि शिताफीने तपास करत कोल्हापूरमधून कृष्णाथ वायगडे (रा. कोल्हापूर), राजेंद्र रावळ (रा. हुपरी), कृष्णनाथ वायगडे (रा. हुपरी) आणि शिवानंद भंडारी (रा. हुपरी) या चारही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे.
स्थानिक मच्छिमार आणि मत्स्यव्यावसायिकांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी पर्यटकांनी स्थानिकांशी वागताना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून, अशा घटनांमुळे पर्यटनाला गालबोट लागत असल्याची चिंता व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.