Ketevan the Martyr History Murder Mystery And DNA Test
पणजी: इस्लाम स्वीकारण्यास नकार देणाऱ्या जॉर्जियाची राणी केटवन यांची क्रूर हत्या करण्यात आली. गरम सळईने तिच्या डोक्याचे दोन भाग करुन जीवे मारण्यात आले. राणीचं थडगं उकरुन तिचे अवशेष पोर्तुगीजांनी गोव्यात आणले.
चारशे वर्षानंतर राणीच्या गोव्यातील अवशेषांची डिएनए चाचणी केली. अवशेष केटवन राणीचे असल्याची खात्री पटल्यानंतर भारत सरकारने २०२१ साली ते अवशेष जॉर्जिया सरकारकडे सूपूर्द केले.
संत फ्रान्सिस झेवियर यांच्या गोव्यातील अवशेषांची डिएनए चाचणी करण्याची मागणी गोवा आरएसएसचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केल्याने वादंग निर्माण झाला आहे.
गेल्या चार दिवसांपासून रस्त्यावर उतरलेला गोव्यातील ख्रिस्ती समाज वेलिंगकरांच्या अटकेची मागणी करत आहे.
झेवियर यांच्या अवशेषांच्या डिएनए चाचणीचा मुद्दा वादात सापडला असताना केटवन राणीच्या गोव्यातील अवशेषांची झालेली चाचणी पुन्हा प्रकाशात आली आहे.
सुमारे चारशे वर्षे गोव्यातील ऑगस्टीन टॉवर येथे राणीचे अवशेष पडून होते.
२००५ साली हे अवशेष सापडल्यानंतर २०१३ साली या अवशेषांची डिएनए चाचणी करण्यात आली. डिएनए चाचणीनंतर २०२१ रोजी रीतसर हे अवशेष जॉर्जिया सरकारकडे सूपूर्द करण्यात आले.
कोण होती राणी केटवन? (Who Was Ketevan Queen of Georgia)
पूर्व जॉर्जियातील काखेती साम्राज्याची केटवन राणी होती. ऑटोमन साम्राज्य (सध्याचे तुर्की) आणि सफाविद साम्राज्य ( सध्याचे इराण) या दोन विशाल इस्लाम साम्राज्याच्या मधोमध काखेती हे एक छोटं साम्राज्य होतं.
ऑर्थोडॉक्स चर्च ऑफ अमेरिकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, बॅग्राटिओनी रॉयल फॅमिलीत १५६० साली केटवन यांचा जन्म झाला होता. काखेती साम्राज्याचे ज्येष्ठ वारसदार डेव्हिड यांच्याशी केटवन यांचा विवाह झाला.
डेव्हिड यांचा भाऊ कॉनस्टेन्टाईन सफाविद साम्राज्याचे राजे शाह अब्बास -१ यांच्याकडे ओलिस होता. शांततेसाठी रॉयल कुटुबांच्या सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडे ओलिस ठेवणे ही त्याकाळी सामान्य प्रथा होती. कॉनस्टेन्टाईनचे धर्मांतर करुन त्याचे 'कॉनस्टेन्टाईन मिर्झा' असे नामकरण करण्यात आले होते.
सत्तासंघर्ष (History)
केटवनचे पती डेव्हिड यांचा १६०२ मध्ये मृत्यू झाला. डेव्हिडचे वडील आलेक्झांडर -१ यांनी मुलाच्या जागी गादीवर बसावे असा दबाव त्यांच्यावर निर्माण करण्यात आला. दरम्यान, अधिकारक्षेत्र वाढविण्यासाठी शाह अब्बास -१ ने १६०५ साली डेव्हिड यांचा भाऊ कॉनस्टेन्टाईन मिर्झाला वडिलांचा आणि उरलेल्या भावांचा खून करण्यासाठी काखेती येथे पाठवले.
कॉनस्टेन्टाईनने केटवन यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला पण, यामुळे संतप्त झालेल्या राणीच्या निष्ठावंतांनी त्याचा खून केला. व केटवन आणि डेव्हिड यांचा मुलगा तैमुराज याला राजा घोषित करावे, असा प्रस्ताव राजा शाह अब्बास -१ समोर ठेवला.
तैमुराजकडे सत्ता आल्यानंतर आई केटवन आणि दोन मुले (आलेक्झांडर आणि लेवन) यांना पर्शियन कोर्टात डांबून ठेवण्यास शाह अब्बास -१ ने त्याला भाग पाडले.
१६१४ ते १६२४ केटवन राणीचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे दहा वर्षे ती तुरुंगात होती.
धर्मांतराचा प्रयत्न (Conversion)
जॉर्जिया सरकारच्या मते केटवनचा मुलगा राजा तैमुराजने सफाविद सरकारच्या विरोधात रशियातील झारची मदत घेण्याचा प्रयत्न केला. तैमुराजने केलेल्या या प्रयत्नाचे प्रायश्चित म्हणून शाह अब्बास -१ ने केटवन राणीसमोर इस्लाम स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला.
धर्मांतरास नकार दिल्यानंतर राजाने केटवन राणीचा अमानुष छळ करुन जीवे मारण्याचे आदेश दिले.
राणीसोबत केलेल्या छळाची माहिती ऑर्थोडॉक्स चर्च ऑफ अमेरिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
राणीवर अन्वनीत अत्याचार करण्यात आले. तिच्या डोक्यात आणि छातीत गरम लोखंडाच्या सळईने छेद करण्यात आले. शरीरात विविध ठिकाणी गरम सळई खुपसण्यात आली. तिच्या हातीची नखं उपसून काढण्यात आली. अखेर गरम फावड्याने तिच्या डोक्याचे दोन तुकडे करण्यात आले, अशी तिच्या छळाची माहिती देण्यात आली आहे.
राणीचा मृतदेह शिराज (इराण) येथे दफन करण्यात आला. राणीच्या दोन जवळच्या पोर्तुगीज ऑगस्टीन भीक्षुकांनी कबरीचा शोध घेऊन तिच्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले. नंतर ते अवशेष काखेती येथील तेमुराज येथे हलविण्यात आले.
दरम्यान, भागात सतत छापे पडत असल्याने अवशेषांची सुरक्षितता लक्षात घेऊन ते विविध ठिकाणी हलवले जात असताना त्याचे काही भाग हरवले. पोर्तुगीजांना अवशेषातील उजवा हात आढळला तो गोव्यातील ऑगस्टीन चर्चमध्ये दफन करण्यात आल्याची माहिती ऑर्थोडॉक्स चर्चच्या नोंदीत आढळते.
केटवन राणीच्या मृत्यूनंतर जॉर्जिया ऑर्थोडॉक्स चर्चने तिला संत पद बहाल केले. जबरदस्ती धर्मांतराला विरोध करणारी राणी अशी तिची ओळख निर्माण झाली. ऑर्थोडॉक्स चर्च जॉर्जियातील एक प्रभावशाली संस्था मानली जाते.
भारत सरकारकडून उत्खनन आणि डिएनए चाचणी (DNA Test)
केटवन राणीचे अवेशष ओल्ड गोव्यातील ऑगस्टीन टॉवर येथे असल्याची माहिती समोर आल्यानंतर येथे उत्खनन करण्यास भारत सरकारकडून परवानगी देण्यात आली.
चर्चच्या संमतीने राणीच्या अवशेषांची डीएनए टेस्ट करून ते अवशेष राणीचेच होते हे सिद्ध झाल्यावर १० जुलै २०२१ रोजी भारत सरकारने ते जॉर्जिया सरकारच्या स्वाधीन केले.
संत फ्रन्सिस झेवियर यांच्या डिएनए चाचणीच्या मागणीने गोव्यात वाद (Saint Francis Xavier Goa)
हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक आणि गोवा आरएसएसचे माजी अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी संत फ्रान्सिस झेवियर यांच्या डिएनए चाचणीची मागणी केली. गोव्यातील इनक्विझिशनच्या काळात बळी गेलेल्या लोकांचे श्राद्ध घालून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी वेलिंगकरांनी ही मागणी केली.
वेलिंगकरांच्या मागणीने राज्यातील ख्रिस्ती समाज आक्रकम झाला असून, त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शेने केली. वेलिंगकरांना अटक होत नाही तोवर शांत बसणार नाही, अशी भूमिका समुदाने घेतली आहे. राज्यातील कॅथलिक मंत्री आणि नेत्यांनी देखील याप्रकरणी वेलिंगकरांच्या विरोधात भूमिका घेत कारवाईची मागणी केली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील गोव्यातील या परिस्थितीची दखल घेऊन भाजपवर टीका केली.
गोवा पोलिसांनी सुभाष वेलिंगकरांना दोन नोटीस बजावल्या असून, त्यांच्या अटकेसाठी गोव्यासह महाराष्ट्रात त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.