
पणजी: काश्मीरच्या पहलगाम भागात नुकत्याच झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्यभरात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन (व्यापक शोध मोहीम) सुरू केले आहे. या कोंबिंग ऑपरेशनमध्ये आज राज्यभरात ६६६ संशयित सापडले. त्यापैकी १४७ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.
२४ तासांत पोलिसांनी २ हजार १८९ जणांची कागदपत्रे तपासली. ७० जणांना पोलिस ठाण्यात आणून चौकशीनंतर सोडले. दरम्यान, पोलिसांनी १ हजार ५२३ जणांची पडताळणी केली असता त्यांच्याकडे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही.
या कोंबिंग ऑपरेशनमध्ये नजीकच्या पोलिस ठाण्यात भाडेकरू म्हणून नोंद नसलेल्यांना तसेच ओळख पटवू न शकलेल्यांना पोलिस ठाण्यात आणून ओळख पटवली जात आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, राज्यात सुरक्षेचा उच्चतम इशारा देण्यात आला आहे. संभाव्य धोक्याची कल्पना लक्षात घेता, गोवा पोलिसांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आणि धडाकेबाज शोधमोहीम सुरू केली आहे. राज्याच्या शांततेला तडा जाऊ न देता, कोणतीही संशयास्पद हालचाल रोखणे आणि संभाव्य धोक्याचा बीमोड करणे असा या मोहिमेचा उद्देश आहे.
संपूर्ण गोवा सध्या अधिक सुरक्षिततेच्या छायेखाली आहे. पोलिसांचा दृढ संकल्प आहे की, कोणत्याही संशयास्पद व्यक्तीला किंवा घटकाला राज्यात मुजोर होऊ दिले जाणार नाही. गुप्तचर यंत्रणा, पोलिस विभाग आणि प्रशासन यांचा समन्वय साधून ही शोधमोहीम युद्धपातळीवर चालू आहे. पहलगामसारखी घटना देशाच्या इतर कोणत्याही भागात घडली तरी, गोव्यात तिचा परिणाम घडवून आणू देणार नाही, अशी राज्य यंत्रणेची ठाम भूमिका आहे. संभाव्य अतिरेकी, देशद्रोही किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या मोहिमेच्या जाळ्यातून सुटू शकणार नाहीत.
गोवा पोलिसांनी या मोहिमेद्वारे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अमलात आणले आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती पोलिस तपासणीतून सुटणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणताही गोंधळ न माजवता, अत्यंत शिस्तबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत ही मोहीम राबवली जात आहे. गुप्तचर विभागाची विशेष पथके देखील या मोहिमेत सक्रिय सहभागी झाली आहेत. राज्यातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून संशयास्पद हालचालींचा मागोवा घेण्यात येत आहे. फसव्या कागदपत्रांद्वारे वावरणाऱ्या व्यक्तींना गाळून काढण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापरही वाढवण्यात आला आहे.
या धडक मोहिमेमुळे काही भागात नागरिकांना तात्पुरती गैरसोय सहन करावी लागत आहे. मात्र, बहुतांश नागरिकांनी पोलिस मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. ‘आपली सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यामुळे पोलिस तपासणीत सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे,’ असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. पोलिसही नागरिकांशी सौजन्याने वागत असून जिथे शक्य आहे तिथे प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ही मोहीम सामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी नव्हे, तर राज्याच्या सुरक्षेसाठी राबवली जात आहे.
गोवा हे देशातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून लाखो पर्यटकांचा आवडता मुक्काम आहे. त्यामुळे राज्याच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी प्रशासन अतिशय कठोर पावले उचलत आहे. पोलिस अतिरिक्त महासंचालक ओमवीरसिंह बिष्णोई यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना आदेश दिले आहेत की, कोणत्याही गुप्त माहितीची तत्काळ दखल घेऊन संशयास्पद हालचालींवर कारवाई केली जावी. सीमा तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची व प्रवाशाची बारकाईने झडती घेतली जात आहे.
१. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोलिसांची कुमक लक्षणीय वाढली आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे स्थानके, बसस्थानके, हॉटेल्स, लॉजिंग्स या ठिकाणी तपास वाढवला आहे.
२. ओळखपत्रे नसलेली व्यक्ती, प्रवासाचा उद्देश स्पष्ट करू न शकणारे किंवा संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. विशेष पथके स्थापन करून थेट कारवाई सुरू केली आहे.
३. संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेतले जात असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तपासणीवेळी माहितीमध्ये तफावत आढळल्यास कठोर चौकशी सुरू केली जात आहे.
४. राज्यात अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नसली, तरी पोलिसांनी संशयित हालचालींवर प्रभावी पायबंद घातला आहे.
महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणाऱ्या सीमेवरील दोडामार्ग येथील पोलिस तपासणी नाक्यावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दोडामार्ग येथे रात्रंदिवस सुरक्षा यंत्रणेकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिवसभरात मडगाव, करमळी व थिवी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर उतरून राज्यात प्रवेश करणाऱ्यांची चौकशी केली. ते कुठून आले, का आले आणि कुठे जाणार याची माहिती पोलिसांनी नोंदवून घेतली. त्यांची ओळखपत्रेही तपासली.
तेरेखोल किनारी पोलिसांनी आज संध्याकाळी केरी, हरमल, स्वीटवॉटर लेक आदी किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घातली. यावेळी काही विक्रेते व संशयास्पद वाटणाऱ्या सुमारे ५० व्यक्तींची चौकशी करण्यात आली.
सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल, मेरशी आणि इंदिरानगर परिसरात जुने गोवे पोलिसांनी २५२ जणांची चाैकशी करून ३३ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांनी दिली.
कळंगुट पोलिसांनी आज दिवसभरात कळंगुट परिसरात वास्तव्यास असलेल्या ८० काश्मिरींची भेट घेतली. त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्याबाबत आश्वस्त करण्यात आले. सरकारने राज्यात राहणाऱ्या काश्मिरींना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनी ही कृती केली आहे. किनारी भागातील अनेक प्रकारच्या व्यवसायात हे काश्मिरी आहेत.
तपासणीदरम्यान जर कोणत्याही व्यक्तीकडे वैध ओळखपत्रे, प्रवासाचे ठोस कारण किंवा स्थलांतराचा अधिकृत पुरावा नसेल, तर त्याची चौकशी अधिक सखोल केली जात आहे. काही ठिकाणी मजूर वसाहतींमध्ये विशेष मोहिमा राबवून कामगारांची नोंद तपासली जात आहे, जेणेकरून अवैध स्थलांतरितांच्या आडून कोणतेही संभाव्य धोके उभे राहू नयेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.