केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार 2015 मध्ये तयार झालेल्या तमनार वीजवाहिनी आंतरराज्य प्रकल्पाला कर्नाटकने विरोध केला आहे. अणशी-दांडेली या व्याघ्र राखीव क्षेत्रातून जाणाऱ्या प्रस्तावित गोवा-तमनार प्रकल्पामुळे तब्बल 62 हजार झाडांची कत्तल होईल, असे म्हणत कर्नाटकने आक्षेप घेतला आहे.
या नवीन घडामोडीचे गोव्यातील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांनीही स्वागत केले आहे. ‘आम्ही आजवर सांगत होतो, तेच खरे होते, हे आता सिद्ध झाले आहे,’ अशी प्रतिक्रिया या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या रेनबो व्होरियर्सचे निमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.
सुपा येथून जुन्या मार्गानेच ही वाहिनी आणणे योग्य आहे. त्यामुळे वनक्षेत्राची प्रचंड प्रमाणात होणारी हानी टळेल, असे ते म्हणाले. 13 एप्रिल रोजी झालेल्या केंद्रीय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत कर्नाटकाने जो आक्षेप घेतला होता, त्याची दखल घेत राज्यातील वन्यजीव आणि पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन कर्नाटकने यासंबंधी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी शिफारस केली होती.
गोव्यातील पर्यावरणप्रेमींनी केले भूमिकेचे स्वागत
प्रकल्प बाळगणार!
प्रकल्पासंदर्भात पर्यावरणाचा विचार करून कर्नाटकने योग्य ताे निर्णय घ्यावा, अशी शिफारस केंद्रीय उच्चाधिकार समितीने केल्याने हा प्रकल्प आता बारगळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील पर्यावरणालाही मोठी हानी होणार, असा दावा गोव्यातील पर्यावरणप्रेमींचा पूर्वीपासून असून त्यांचाही याला विरोध आहे.
पर्यावरणासाठी हानीकारक प्रकल्प
हा प्रकल्प पर्यावरणासाठी हानीकारक असल्याचा दावा पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते गिरीधर कुलकर्णी यांनी केला होता. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने गोव्याच्या भागातील कामाला मान्यता देताना कर्नाटकाची बाजू ऐकून घेतली नव्हती, याकडे उच्चाधिकार समितीचे लक्ष वेधले होते.
177 हेक्टर वनक्षेत्रांवर प्रभाव
400 केव्ही क्षमतेची ही वीजवाहिनी धारवाड येथील नरेंद्र पाॅवर ग्रीडपासून सुरू होऊन ती गोव्यातील शेल्डेपर्यंत येणार आहे. एकूण 94 किलोमीटर लांबीची ही वाहिनी असून त्यातील ७२ कि.मी. क्षेत्र कर्नाटकमधील आहे.
त्यात अणशी-दांडेली व्याघ्र प्रकल्पातील ६.६ कि.मी. अंतराचा समावेश आहे. हा प्रकल्प मार्गी लावायचा असेल तर धारवाड, बेळगावी आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील सुमारे १७७ हेक्टर वनक्षेत्र त्याच्या प्रभावाखाली येणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.