कला अकादमीची निर्दोष वास्तू कला रसिकांना कधी उपलब्ध होईल याचे उत्तर सध्या कोणाकडेच नाही. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनीही कला अकादमीची वास्तू पूर्ववत कधी उपलब्ध होणार हे सांगण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.
एरव्ही कोणत्याही प्रश्नावर बिनधास्तपणे उत्तरे देणारे गावडे आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सातत्याने जाणवत राहिले.
एका बाजूने कला व संस्कृती खात्याने कला अकादमीच्या वास्तूच्या कामात नूतनीकरणानंतर अनेक त्रुटी शोधल्या असून त्याची जंत्रीच सार्वजनिक बांधकाम खात्याला दिल्याचे ते सांगत होते. तर दुसऱ्या बाजूने दीनानाथ मंगेशकर नाट्यमंदिर भाड्याने देण्यास हरकत ती काय, अशी विचारणा करत होते.
या सभागृहातील ध्वनियंत्रणा नव्याने बसवल्याने तंत्रज्ञांना ती हाताळता येत नाही, असे त्यांनी सांगितले. त्याच प्रश्नावर पुन्हा बोलताना त्यानी 'फ्रिक्वेन्सी' वाढवावी लागणार असल्याने आणखीन यंत्रणा आणावी लागेल त्याचा आदेश निवडणूक आचारसंहितेमुळे देता येत नाही असा खुलासा केला.
या विषयावर ते फारच गोंधळले होते. सभागृहाच्या नूतनीकरणानंतर घेतलेल्या चाचणीवेळी नाट्य, संगीत, तियास्त्रीस्त यांना पाचारण केले होते. त्यांना ध्वनियंत्रणेत कोणतीही त्रुटी जाणवली नाही, असे त्यांनी सांगितले.
कलाकार ही ध्वनी यंत्रणा सदोष असल्याचा आरोप करतात, असे सांगितल्यावर कोण ते कलाकार माझ्यासमोर आणा! हू इज राजदीप ? असा प्रश्न त्यांनी केला.
मात्र, असे करताना काही कार्यक्रम आयोजक आपली ध्वनी यंत्रणा आणून कार्यक्रम करतात हेही मान्य केले. कला अकादमीच्या या सभागृहाला लागलेल्या गळतीचे खापर सुक्या पानांवर फोडण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.