Kala Academy: माऊली थिएटर्स म्हापसा या संस्थेने, सीताराम महाबळेश्वर रेडकर लिखित ‘झुरळ’ हे नाटक स्पर्धेत सादर केले. एका स्वप्नदृश्यात चित्र काढताना नाटकाची सुरवात होते. लगेच ब्लॅकआऊट, नंतर एका घराचे दृश्य दिसते. म्हातारपणाकडे झुकलेले गिरीधर आणि गिरिजा, मुलगा गौरव हे या घरात राहतात. मुलगा कंपनीत मार्केटिंगचे काम करतो.
पुढे दृश्य गौरवच्या ऑफिसचे, जिथे गौरवचा बॉस रंजन आणि त्याची प्रेयसी वीणा यांचे स्वभावदर्शन होते. गौरव आणि वीणाच्या भेटीदरम्यान पंडितचा फोन येऊन पुढील दृश्यात रॉनी आणि पंडित या व्यक्तिमत्त्वांचे दर्शन होते. पैशांची चणचण भासत असल्यामुळे गौरव झटपट पैसे कमावण्याच्या नादात ड्रग्ज व्यवसायाच्या जाळ्यात अडकून स्वतःचा सर्वनाश ओढवून घेतो.
व्यवहाराच्या वादातून यथेच्छ मार खाल्लेला, स्वतः ड्रग्जसेवनाच्या आहारी गेलेला गौरव शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकरित्या पूर्णपणे खचून जाऊन मनोरुग्ण बनतो.
घरी स्वतःच्या बेडरूममधील कोंडून घेतलेल्या अवस्थेतील त्याच्या मनातील भावनात्मक कल्लोळ लेखकांनी दाखवून दिले आहेत. शेवटी त्याचे हाल न पाहावल्यामुळे आई गिरिजा स्वतःच्या हाताने विष देऊन त्याचा मृत्यू घडवून आणते.
कंपनीत उच्च पदावर असलेल्या गौरवकडून काम, कौटुंबिक जबाबदारी आणि स्वतःच्या प्रेयसीच्या बाबतीत धाडसी कृतींची अपेक्षा असताना तो अपरिपक्व स्वप्नाळू आणि व्यसनाधीन झाल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींसमवेत स्वतःचाही नाश ओढवून घेतो, असे सुंदर नाट्यबीज असलेली ही संहिता.
लेखकांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या तंत्रातून लिहिलेल्या, भावनांची अतिशयोक्ती दर्शविणाऱ्या, अतिनाट्यातील संवादांमुळे दिग्दर्शकीय संस्कार करूनही नाटक ‘मोनोटोनस’ बनले.
गौरवच्या जीवनातील संघर्ष अतिशयोक्तीतेतून प्रकट न करता संहितेच्या ‘सबटेक्स’मधून आला असता तर इब्सेनने ‘अ डॉल्स हाऊस’ या आजच्या आधुनिक स्त्रीवर लिहिलेल्या नाटकासारखे, सीताराम रेडकर यांचे नाटक आजच्या वाहवत गेलेल्या तरुणाईवर लिहिलेले ‘मॉडर्न ट्रॅजेडी’ नाटक बनले असते.
नाटकातील व्यक्तिरेखांचे चित्रण त्यांच्या स्वभावातून करण्यापेक्षा लेखकांनी त्यांना आपण कोण आहोत. हे संवादातून सांगण्यास भाग पाडल्यामुळे नाटक घडण्याऐवजी, सांगणे झाले.
दिग्दर्शक संतोष शेटकरांनी दुसऱ्या अंकात गौरवच्या मनातील विचार ‘दशावतार’ या कलाप्रकाराचा आधार घेऊन ‘स्टायलाइज्ड’ संवादांतून आणि अभिनयातून मांडून सादरीकरणाची दिशा बदलून वेगळा अनुभव देण्याचा सुंदर प्रयत्न, मुळात इतर वेळी अतिनाट्यात सादर झालेल्या गौरवच्या दृश्यांमुळे सफल झाला नाही.
गौरवच्या स्वप्नसदृश्य ‘आंतरिक विचार’ प्रगटनातील दृश्ये फार कलात्मकतेने सादर झाली. ‘कोरियोग्राफी’ छान जमली. विशेषतः गौरव आणि वीणा यांचे चित्र काढण्याचे दृश्य अप्रतिम होऊन बरेच काही सांगून गेले.
दिग्दर्शकांनी पात्रांच्या संवादफेक आणि भाषेवर लक्ष द्यावयास हवे होते. तसेच संवादांची काटकसर करून नाट्यमयता वाढविली असती तर अपेक्षित परिणाम साधला असता.
‘वीणा’ या भूमिकेतून धनश्री नाईक यांनी आपली व्यक्तिरेखा व्यवस्थितपणे सादर केली. एका दृश्यात डाव्या हाताची केलेली अतिरिक्त हालचाल खटकली. कोरियोग्राफीमधील दृश्ये मोहक झाली.
‘गिरीधर’च्या व्यक्तिरेखेत चंद्रकांत प्रियोळकर फिट्ट बसले. ‘गिरिजा’ झालेल्या मनीषा हरमलकर यांनी संवादाच्या आणि अभिनयाच्या नैसर्गिकतेवर भर द्यावयास हवा होता. ‘रंजन’ची भूमिका करणारे अमर कोनाडकर ठीक दिसले; पण संवादफेकीत सुधारणा आवश्यक होती.
लॅपटॉपवर टाईप करताना त्यांची बोटे द्रूतलयीतील गाण्याला साथ करणाऱ्या हार्मोनियम वादकाप्रमाणे फिरत होती. ‘रॉनी’ची भूमिका रूपेश गवस यांना अतिशय शोभून दिसली आणि त्यांचा अभिनयही नैसर्गिक वाटला. ‘पंडित’ या छोट्याशा भूमिकेत प्रेमानंद कलशावकर यांनी योग्य रंग भरला.
काळ्या पार्श्वभूमीच्या पडद्यावर शैलेश चारी यांनी केलेली नेपथ्यरचना छान वाटली. घराचा सेट अत्यंत कमी साधनांतून छानपणे दाखविला गेला. ऑफिसही अचूक ‘इस्टॅब्लिश’ झाले. उजव्या बाजूस लावलेले चित्र प्रेक्षकांना नाटक सोपे करून दाखविण्यास लावल्यासारखे वाटले.
डॉमनिक डिकॉस्टा यांची प्रकाशयोजना ठिक होती; पण योग्य तालमीअभावी हाताळणीत चुका झाल्या. प्रदीप नाईक यांनी पार्श्वसंगीतातून अपेक्षित परिणाम साधला. हर्षद नाईक यांची रंगभूषा तर अनुपमा सीताराम रेडकर यांची वेशभूषा होती.
संगीतसाथ ॲड. राजेंद्र काणकोणकर (हार्मोनियम), अविनाश कवळेकर (पखवाज) आणि महानंद कवळेकर (गायक). निर्मिती प्रमुख सीताराम रेडकर तर साहाय्यक म्हणून ॲड. अक्षता रेडकर च्यारी, संजीव च्यारी, नंदकुमार शेट्ये आणि अनिकेत वेरेकर यांनी काम पाहिले.
भूमिकेत परिणामकारकता
‘गौरव’ या मध्यवर्ती भूमिकेत विराज नाईक यांनी शेवटपर्यंत आपला ‘एनर्जिक फॉर्म’ टिकवून ठेवला. जर लेखकाने किंवा दिग्दर्शकाने त्याच्या वास्तविक जीवनातील व्यक्तिचित्रण व्यवस्थितपणे, हळुवारपणे चित्रित केले असते तर त्याच्या आंतरिक विचारांवर सादर झालेल्या ‘कॉन्ट्रास्ट’मधील दृश्यांमधून अभिनयाच्या सीमारेषा अधिक स्पष्ट होऊन गहन परिणामकता जाणवली असती.
शेवट खटकला: नाटकाच्या शेवटी गौरवची आई त्याला विष देते. गौरवचा मृत्यू झाल्यानंतर वडील गिरीधर पूर्वी चौकशी करूनही न गेलेल्या इसमाकडे, टायपिंगच्या जॉबसाठी बारा दिवसांनी हजर राहीन असा फोन करतात.
यामुळे नाटकाचा शेवट गौरवच्या ड्रग्सच्या विषयावर फोकस न करता गिरीधरने आपल्या आयुष्यात म्हातारपणी काम करून कुटुंबाला हातभार न लावल्यामुळे गौरवचा भयानक शेवट झाला, असे सूचित झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.