डिचोली तालुक्यातील ग्रामीण भागात कदंबाची बससेवा कोलमडली असून विद्यार्थी, शिक्षकांना वेळेत शाळेत पोचणे कठीण होत आहे. 'कदंब'ची प्रवासी बससेवा नियमित करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आहे.
मुळगावमार्गे आमठाणे ते पणजी मार्गावर वाहतूक करणाऱ्या ''कदंब''च्या प्रवासी बसगाडीचा अनियमितपणा सध्या वाढला आहे, अशी मुळगावसह अन्य ग्रामीण भागातील प्रवाशांची तक्रार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून सदर बससेवा अनियमित आहे. बसच्या अनियमितपणामुळे नोकरीधंद्यानिमित्त शहराच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसह विविध भागात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थीवर्गाचेही हाल होत आहेत.
आमठाणेहून सुटणारी कदंबची बस मेणकूरे-अडवलपालहून मुळगावमार्गे डिचोलीहून पणजी मार्गावर वाहतूक करणारी ''कदंब''ची प्रवासी बससेवा ग्रामीण भागातील प्रवाशांना विशेष करून विद्यार्थ्यांना सोयीस्कर असली, तरी या बसच्या अनियमितपणात दिवसेंदिवस वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
मुळगाव येथील विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी ही बस अस्नोड्याहून मुळगावमधील अंतर्गत मार्गाने वाहतूक करीत आहे. डिचोली शहरात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी याच बसवर अवलंबून असतात. मात्र बस आली नाही, तर विद्यार्थी अडकून पडतात. मग विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते. विद्यार्थीही वेळेवर शाळेत पोचत नाहीत, अशी विद्यार्थ्यांसह पालकांची तक्रार आहे.
मुळगाव-आमठाणेप्रमाणेच शिवोली सारख्या ठिकाणीसुद्धा अनेक वेळा कदंब बस गायब होते, त्यामुळे सकाळी किंवा दुपारी विद्यर्थी - शिक्षकांना वेळेवर ये-जा करता येत नाही. वेळापत्रकाप्रमाणे सोडल्या जात नाहीत. त्यामुळे कदंबावर विश्वास कसा ठेवावा, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
महामंडळाने लक्ष द्यावे!
मुळगावातून शहरात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही बस सोयीस्कर आहे. विद्यार्थ्यांची सोय व्हावी, म्हणून मुळगावमधील अंतर्गत मार्गाने ही बस सुरू करण्यात आली आहे. मात्र ही बस आता बेभरवशाची झाली आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून दहा ते बारावेळा ही बस आलेली नाही. बस नसली की, विद्यार्थ्यांना धावपळ करून मुख्य रस्त्यापर्यंत पायपीट करावी लागते. दुपारीही वेळेत घर गाठता येत नाही, असे पालक तथा मुळगावचे माजी सरपंच संतोष सराफ यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.