

पणजी–सावंतवाडी मार्गावर धावणाऱ्या कदंबा परिवहन महामंडळाच्या बसचा सोमवारी रात्री अपघात झाल्याने काही काळ वाहतुकीत गोंधळ निर्माण झाला. तोरसे-राजवेळवाडा जंक्शन परिसरात हा अपघात घडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बस सावंतवाडीच्या दिशेने प्रवास करत असताना तिचा पुढील टायर अचानक फुटला. वेगात असलेल्या वाहनाचा टायर फुटल्याने चालकाला बस नियंत्रित करण्यात अडचण निर्माण झाली. काही क्षणांतच बस रस्त्याच्या कडेला असलेल्या स्ट्रीट लाईटच्या खांबावर आदळली.
धडकेचा जोर इतका होता की खांबाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर बस विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेली. अपघाताचे स्वरूप गंभीर असले तरी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातात बस चालकाला किरकोळ दुखापत झाली. स्थानिक नागरिक आणि इतर वाहनचालकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. चालकावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर काही काळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मात्र सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.