Ponda News : वेरे-वाघुर्मे ग्रामसभेत निर्णय ; शितोळ तळ्याचे बांधकामच रद्दबातल!

यापुढे कोणतेही विकासकाम करायचे झाले तर ग्रामस्थांना विश्‍वासात घेतल्याशिवाय करू नये, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
Gramsabha
Gramsabha Dainik Gomantak

Ponda News : फोंडा, वेरे-वाघुर्मे पंचायत क्षेत्रातील भूतखांब पठाराजवळील शितोळ तळ्याच्या बांधकामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध करून सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या तळ्याचे बांधकामच रद्दबातल ठरवण्याचा निर्णय वेरे-वाघुर्मे पंचायतीच्या ग्रामसभेत एकमुखाने घेण्यात आला.

आज रविवारी झालेल्या या ग्रामसभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शितोळ तळ्याच्या एकाच विषयावर ही ग्रामसभा तीन तास चालली व सुरू असलेले बांधकाम रद्द करून आहे त्या स्थितीत या तळ्याचे काम पूर्ववत स्थितीत आणण्यासंबंधीचा ठराव संमत झाला.

यापुढे कोणतेही विकासकाम करायचे झाले तर ग्रामस्थांना विश्‍वासात घेतल्याशिवाय करू नये, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे.

सरपंच शोभा पेरणी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी उपसरपंच बाबू गावडे तसेच इतर सर्व पंचसदस्य उपस्थित होते. पंचायत सचिव प्रसाद नाईक यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केल्यानंतर सुरवातीलाच शितोळ तळ्याचा प्रश्‍न उपस्थित झाला.

यावेळी ग्रामस्थांनी हे काम त्वरित रद्द करून तळे आहे त्या स्थितीत पूर्वपदावर आणावे असा धोषा लावला.

शितोळ तळ्याचे काम हे ग्रामस्थांना पाणी पुरवण्यासाठी आहे की भविष्‍यात उभे राहणाऱ्या निवासी प्रकल्पांसाठी आहे, असा सवाल उपस्थित करून ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला धारेवर धरले.

सरपंच शोभा पेरणी तसेच उपसरपंच बाबू गावडे यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले.

ग्रामसभेला जलस्त्रोत खात्याचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडून या तळ्याचा विकास व बांधकामासंबंधीची माहिती देण्यात येणार होती, त्यासाठी प्रोजेक्टरही लावण्यात आला होता, पण ग्रामस्थांनी तो सुरू करण्यास तीव्र आक्षेप घेत

शितोळ तळ्याचे नैसर्गिक स्वरूप नष्‍ट करून, गावातील लोकांना पाण्याला मोताद करून नवीन काँक्रीटचे बांधकाम नकोच, असा असा आग्रह धरला. हे बांधकामच रद्द झाले असा ठराव खुद्द पंचायत मंडळाने घ्यावा असे ग्रामस्थांनी सुचविले. त्यामुळे सरपंच शोभा पेरणी व उपसरपंच बाबू गावडे यांनी ठराव मांडला व तो सर्वानुमते संमत करण्‍यात आला. या ग्रामसभेत इतर विषयांवरही चर्चा झाली.

साबांखाकडून ‘प्रेझेंटेशन’ झालेच नाही

शितोळ तळ्याचा विकास तसेच इतर बांधकामासंबंधीचे प्रेझेंटेशन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जलस्त्रोत खात्याकडून प्रॉजेक्टरद्वारे होणार होते. त्यासाठी खात्याचे साहायक अभियंते शैलेश नाईक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Gramsabha
Goa Government: राष्ट्रीय स्पर्धेमुळे 600 ते 700 कोटींचा भुर्दंड; राज्य आर्थिक संकटात

मात्र ग्रामस्थांनी आम्हाला प्रेझेंटेशन नकोच, अशी मागणी लावून धरली. पंचायतीला या प्रकल्पासंबंधी काय माहिती आहे, ते आधी सांगा असे ग्रामस्थांनी सांगितले. शेवटी जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभा सोडून जाणेच पसंत केले.

‘तो’ नारळ ठेवला कुणी?

एरवी एखादे विकासकाम सुरू करायचे झाले तर सरकारची संबंधित खाती गाजावाजा करतात. पण शितोळ तळ्याचे काम सुरू करताना कोणताच गाजावाजा करण्यात आला नाही की कुणाला कळूही देण्यात आले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

हे काम सुरू करताना देवाला नारळ ठेवण्यात आला, पण तो कुणी ठेवला ते आधी सांगा, असे ग्रामस्थांनी सांगितले. सरपंच तसेच सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी नारळ कुणी ठेवला ते माहीत नाही असे सांगताच, प्रचंड गदारोळ माजला. मात्र शेवटपर्यंत नारळ कुणी ठेवला ते समजू शकले नाही.

सावईवेरेला पाणी हवेच आहे, पुढील काळात ती गरज ठरणार आहे. पण शितोळ तळ्याच्या कामासाठी काँक्रीटीकरण करून नव्हे. त्यासाठी इतर पर्याय निवडावा आणि खात्याच्या अधिकाऱ्यांनी तळ्याच्या कामाचा विचार करताना योग्य निर्णय घ्यावा.

लोकांशी संवाद साधावा. ज्या भागात पाणीटंचाईची भीती आहे, अशा भागात कामाचे प्रेझेंटेशन करावे.

- डॉ. दत्ताराम देसाई, ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com