माझे प्रिय मित्र माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सोनेरी गोवा साकार करण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याची जबाबदारी भाजपच्या प्रत्येक नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी पार पाडावी असे आवाहन मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केले. गोव्याचा समुद्र म्हणजे येथील जनतेचा देव तर देशाचे भाग्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. गोव्याच्या विकासाला पुढे नेण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपला स्पष्ट बहुमत द्या अशी मागणी मुख्यमंत्री चौहान यांनी केली.
दाबोळी (Dabolim) मतदार संघातील नवे वाडे येथील श्री राष्ट्रोळी जय संतोषी माता सभागृहात आयोजित भाजपच्या जाहीर सभेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत दाबोळी भाजप उमेदवार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, दाबोळी भाजप प्रभारी जयंत जाधव, नगरसेवक विनोद किनळेकर, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सूद, दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक, चंद्रकांत गवस, वामन चोडणकर, दिगंबर आमोणकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना मध्य प्रदेश मुख्यमंत्री चौहान म्हणाले की काँग्रेस पक्ष बुडणारे जहाज असून त्याची सत्ता आता संपली आहे.
काँग्रेस (Congress) पक्षाने गोव्याला विकासापासून वंचित ठेवले होते. पंतप्रधान मोदी, केंद्रीय रस्ता अवजड मंत्री गडकरी यांनी गोव्याला नवी दिशा देऊन देशात विकासशील राज्य केले असल्याची माहिती मुख्यमंत्री चौहान यांनी दिली. गोव्याचे मुख्यमंत्री (CM) डॉ. सावंत यांनी येथील प्रत्येकाला कोविड-19 लसीकरण करून शंभर टक्के यश संपादन केले आहे. भाजप म्हणजे विकास, यांचे उदाहरण म्हणजे स्व. मनोहर पर्रिकर, (Manohar Parrikar) ते गोवा साठी शेवटपर्यंत लढले. पर्रिकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच सोनेरी गोवा (goa) करण्यासाठी येथील जनतेने भाजपला साथ द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री चौहान यांनी केली.
दाबोळी भाजप (BJP) उमेदवार माविन गुदिन्हो म्हणाले की भाजप लोकशाहीचा सन्मान करणारा पक्ष असून गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त करणार आहे. दाबोळी विकासात येथील जनतेचे महत्त्वाचे स्थान असून येणाऱ्या काळात दाबोळीचा आणखीन विकास साधणार असल्याची माहिती गुदिन्हो यांनी दिली. यावेळी नगरसेवक विनोद किनळेकर यांचे समयोचित भाषण झाले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गटात अध्यक्ष संदीप सूद यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दाभोळी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष सौ. अनिता थोरात यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.