मडगाव : "आझादी का अमृत महोत्सव" प्रदर्शनात कुंकळ्ळीतील चीफटेन्स विद्रोहाच्या इतिहासाचा केलेला विपर्यास आणि पत्रादेवी हुतात्मा स्मारकाकडे जाणाऱ्या कदंबा बसच्या बिघाडामुळे अडकलेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती दाखवलेली असंवेदनशीलता यामुळे आपला गौरवशाली इतिहास आणि स्वातंत्र्यसैनिकांप्रती भाजप सरकारचा उद्धटपणा उघड होतो, असा गंभीर आरोप कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केला आहे.
(Insensitivity towards freedom fighters exposes arrogance of BJP government; Yuri Alemao)
गोवा सरकारतर्फे आयोजित "आझादी का अमृत महोत्सव" प्रदर्शनात कुंकळ्ळी लढ्याच्या इतिहासाच्या माहितीतील विपर्यासावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, चीफटेन्स मेमोरियल ट्रस्टने घेतलेल्या आक्षेपाशी कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी पूर्ण सहमती व्यक्त केली.
पत्रादेवीला जाताना कदंब बसच्या बिघाडामुळे पर्वरी येथे अडकुन पडलेल्या वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकांना पर्यायी व्यवस्था करुन देण्यास अपयशी ठरलेल्या भाजप सरकारच्या अक्षम्य कृत्याचा मी तीव्र निषेध करतो, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
"आझादी का अमृत महोत्सव" आणि "हर घर तिरंगा" हे भाजप सरकारचे प्रसिद्धी स्टंट एक प्रकारे भाजपवरच उलटले आहेत. भाजपचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबद्दलचा अनादर अनेक उदाहरणांनी उघड झाला. भाजपचे हे दोन्ही उपक्रम म्हणजे २००४ च्या भाजप सरकारच्या "इंडिया शायनिंग" मोहिमेची पुनरावृत्ती होणार असुन, ज्याप्रमाणे २००४ मध्ये भाजप सरकारचा अनपेक्षीत पराभव झाला तेच आता २०२४ मध्ये घडणार आहे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुंकळ्ळी सरदारांच्या विद्रोहाच्या इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करावी. तथ्यांवर आधारीत इतिहासच खरा असतो व कायम राहतो. भाजप सरकार इतिहासाचा विपर्यास करण्यात कधीही यशस्वी होणार नाही. सरकारने इतिहासाची अधिकृत नोंदी तपासणे गरजेचे असुन आणि भगव्या विचारसरणीच्या राजकीय इतिहासकारांनी मांडलेल्या कथनात सरकारने वाहून जाऊ नये, असा टोला युरी आलेमाव यांनी शेवटी हाणला.
ज्यांच्या बलिदानामुळे गोवा मुक्त झाला, अशा स्वातंत्र्यसैनिकांना अत्यंत असंवेदनशील भाजप सरकार योग्य वाहतूक पुरवू शकले नाही, हे खेदजनक आहे. त्यांना इनोव्हा कार किंवा इलेक्ट्रिक कदंब बसेस देण्यास सरकार कशामुळे थांबले? युरी आलेमाव यांनी विचारले. भाजप सरकारची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.