फोंडा: केळबाई- कुर्टी फोंड्यात विजेचा झटका लागल्याने गव्याचा जागीच मृत्यू झाला. १५ वर्षीय गवा शेतकऱ्यांना एका काकडीचे पीक असलेल्या शेतात मृतावस्थेत आढळून आला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, केळबाई- कुर्टी फोंडा येथील एका काकडीचे पीक असलेल्या शेतात गव्याचा मृतेदह आढळून आला. विजेच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेताच्या भोवती लावलेल्या कुंपणाला जोडलेल्या विद्युत तारेच्या झटक्याने त्याचा बळी गेल्याची माहिती समोर आलीय.
सहायक वनसंरक्षक विश्वास चोडणकर यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या भागात मोठ्या प्रमाणावर जंगली प्राण्यांचा वावर पाहायला मिळतो. दरम्यान, विजेच्या झटक्याने जंगणी प्राणी मृत झाल्याची ही पहिलीच घटना आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शेताभोवती उभारण्यात आलेल्या कुंपणात विद्युत प्रवाह होता. दरम्यान, गवा यात गुरफटल्याने त्याचा मृत्यू झाला. नागरिकांना मात्र यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे फोंड्याचे विद्युत कार्यकारी अभियंता सुदान कुंकळकर म्हणाले.
मृत गव्याच्या शवविच्छेदनानंतर तो साधारण ८०० किलोचा असल्याची माहिती समोर आली. कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर मृत गव्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.