गोव्यात मधुमेह रुग्णांची संख्या वाढत असतानाच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (एनएएफएलडी) रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मधुमेह आणि बैठी जीवनशैली हेच या राेगाचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टर सांगतात. या रोगाकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा देत या व्याधीवर वेळीच उपाय केले नाहीत तर लिव्हर सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोगही होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात, ॲन्डो क्रिनोलाॅजिस्ट डॉ. वैभव दुकळे यांना विचारले असता, ते म्हणाले ‘एनएएफएलडी’ची बाधा झालेल्या रुग्णांना लक्षणे सहज दिसून येत नाहीत. मात्र, त्यांच्या यकृताची सोनोग्राफी किंवा फायब्रो स्कॅनची चाचणी केल्यास ही लक्षणे दिसून येतात.
स्थूल व्यक्ती, मधुमेही व्यक्ती, प्री-डायबेटीस आणि अधिक कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींना एनएएफएलडीची बाधा होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. यावर मात करायची असल्यास व्यायाम हा सर्वांत अधिक चांगला उपाय आहे.
एनएएफएलडी या व्याधीने एकूण २० ते ३० टक्के भारतीय ग्रासले आहे. २० ते ४० या कमी वयोगटातील लोकही आता या व्याधीचे शिकार बनू लागले आहेत.
नॉन अल्कोहाेलिक फॅटी लिव्हर व्याधी म्हणजे मद्यसेवन न करणाऱ्या लोकांच्याही यकृताला सूज येण्याचा प्रकार असून या व्याधीचे परिणाम त्वरित कळून येत नसले तरी वेळेवर त्यावर उपाय घेणे गरजेचे आहे. वास्तविक या व्याधीला कसले औषधही नाही. व्यायाम हाच त्यावर सर्वात चांगला उपाय आहे.
‘अल्ट्रासाउंड’द्वारेच होते व्याधीचे निदान
जोपर्यंत यकृताची मोठी हानी होत नाही, तोपर्यंत या रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत.
कुठलीही व्यक्ती अल्ट्रासाउंड चाचणी करते त्यावेळीच ही व्याधी जडल्याचे कळून येते.
ही व्याधी तपासण्यासाठी यकृताची बायप्सी हीच योग्य पद्धत आहे. मात्र, यासाठी इतरही चाचण्या केल्या जातात.
गोव्यातील बरेच लोक आता कष्टाची कामे न करता बैठ्या जीवनशैलीच्या आहारी गेले आहेत. याचाच परिणाम म्हणजे गोव्यात ‘एनएएफएल’डी रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पाच वर्षांत हे प्रमाण लक्षणीय आहे.
- चित्रलेखा नायक, डॉक्टर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.