गंगाराम आवणे
पणजी : पणजी ही गोव्याची राजधानी. दररोज हजारो माणसे पणजीत येजा करतात. कोणी कामाच्या निमित्ताने, कोणी सरकारी कार्यालयात, शिक्षणसाठी, खरेदीसाठी, व्यापारासाठी. काही पर्यटक शहर पाहण्यासाठी पणजीत येतात. मात्र या शहरातील कदंब बसस्थानकाची जी दुरवस्था झाली आहे ती पाहता हे देशातील प्रगत राज्याच्या राजधानीचे बसस्थानक आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. खरी तर एकाअर्थी ही एक मोठी शोकांतिकाच आहे!
पणजी बसस्थानक अनेक समस्येच्या गर्तेत सापडले आहे. या स्थानकावर कुठल्याच गोष्टीचे योग्य नियोजन नसल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. राज्यात पडलेल्या पहिल्याच पावसान तेथे कंबरभर पाणी साचले.
बसस्थानकाशेजारी असलेल्या नाल्यातील गलिच्छ पाणी स्थानकात आले. त्यामुळे बसस्थानकातील गाळेधारकांना आपले साहित्य हलविताना नाकीनऊ आले. प्रवाशांना असल्या दूषित व गलिच्छ पाण्यातून मार्ग काढत जावे लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. बसस्थानक परिसरात असलेल्या गटारांचा गाळ पावसापूर्वी उपसणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने गटारे तुंबू लागली.
त्यामुळे आरोग्याच्या अनुषंगाने देखील विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. बसस्थानकाबाहेरील गटारे केवळ उघडी करून ठेवल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. बसस्थानकावर स्वच्छतेचाही अभाव जाणवतो.
कचरापेटी कुठेय?
कोणत्याही बसस्थानकावर मुलभूत सुविधा असायला हव्यात. पणजी बसस्थानकावर मात्र त्याची कमतरता जाणवतेय. पाण्याची बाटली विकत घेतली असता ती रिकामी झाल्यावर टाकायची कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे अस्वच्छता पसरत आहे.
पावसाळ्यात तरी किमान पत्रे घाला
‘तौक्ते’ चक्रीवादळावेळी पणजी बसस्थानकावरील पत्रे उडाले होते, ते अजून घातलेले नाहीत. सद्यस्थितीत या स्थानकाची डागडुजी करणे शक्य नसेल तर प्रवाशांचे पावसापासून संरक्षण व्हावे, त्यांना निवारा मिळावा यासाठी पत्रे तरी घालावेत, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.