फोंडा: इंधनाप्रमाणे पाण्यालाही मोठी किंमत येणार आहे. केवळ देशातीलच नव्हे, तर जगभरातील पाण्याचे स्त्रोत कमी होऊ लागले असून पाणी वाचवले तरच जीवन वाचेल, असा मंत्रच आता परदेशातील बड्या राष्ट्रांनी दिला आहे. पाणी वाचवण्यासाठी मोठ्या क्लृप्त्याही या राष्ट्रांनी शोधून काढायला सुरवात केली असून इंधनाप्रमाणे पाणीही उद्या परकीय देशांना विकावे लागेल, याचा अंदाज आल्यानेच आता ‘मिशन जल’ अभियान सगळीकडे सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पाण्याच्या समस्येची गंभीर दखल घेत आपल्या खात्यामार्फत पाण्याच्या संवर्धनासाठी जलशक्ती अभियानद्वारे मोठी पावले उचलली आहेत.
जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी राज्यातील जलस्त्रोत खाते तसेच कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांची सिंचन भवनमध्ये एक बैठक बोलावून राज्यातील पाण्याचा साठा, जलस्त्रोतांची ठिकाणे आणि पावसाच्या पाण्याचा अंदाज व वापर यासंबंधी चर्चा केली. विशेषतः पावसाच्या पाण्याचा योग्य वापर झाला, तर गोवा पाण्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होईलच, पण मुबलक पाण्याचा साठाही उपलब्ध होईल, असा दावा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केला असून पावसाच्या पाण्याचे तसेच आहे त्या जलस्त्रोतांचे योग्य नियोजन करण्याचे आदेश या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो. मागच्या तीन वर्षांचा आढावा घेतला, तर दीडशे इंचांपर्यंत पावसाची मजल गेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असला तरी हे पाणी वाहून वाया जात असल्याने भविष्यात या पाण्याची तरतूद करणे शक्य होत नाही. त्यामुळे या पाण्याचा योग्य वापर करून पाण्याचे दुर्भिक्ष्य संपवण्याचा इरादा जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.