गोव्यात मोटरस्पोर्टसबाबत उत्साह आहे. राज्यातील रेसर्सना ट्रॅक सराव, तसेच अन्य सुविधांचा लाभ व्हावा या हेतूने मोटरस्पोर्टस अरेनासाठी प्रयत्न सुरू असून राज्य सरकारशीही अखिल गोवा मोटरस्पोर्टस असोसिएशनने चर्चा केल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष शर्मद रायतुरकर यांनी शनिवारी दिली.
फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या 29 व 30 एप्रिल रोजी भारतीय राष्ट्रीय ऑटोक्रॉस स्पर्धेची दुसरी फेरी होणार आहे.
या स्पर्धेची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेस रायतुरकर, गोवा संघटनेचे सचिव वैभव मराठे, मुंबईस्थित इंडियन ऑटोमोटिव्ह रेसिंग क्लबचे (आयएआरसी) संचालक फराद बथेना, स्पर्धेचे प्रमोटर बंगळूर मोटर स्पोर्टसचे उमेश पांडे यांची उपस्थिती होती.
स्पर्धेची पहिली फेरी पुण्यात झाली होती. सीएट लिमिटेड व आयएआरसी यांच्यातर्फे अखिल गोवा मोटरस्पोर्टस असोसिएशनच्या सहकार्याने गोव्यातील फेरी घेतली जाईल. चार चाकी वाहनांची ही स्पर्धा टाईम अटॅक प्रकारात होईल.
‘‘राष्ट्रीय ऑटोक्रॉस स्पर्धेच्या गोव्यातील फेरीत सुमारे 100 डर्ट ट्रॅक कार रेसर्सचा सहभाग अपेक्षित आहे, त्यापैकी साठ टक्के रेसर्स गोव्यातील असतील. या स्पर्धेसाठी आम्ही उत्साहित आहोत,’’ असे रायतुरकर म्हणाले.
मोटरस्पोर्टस अरेनासाठी विस्तीर्ण जागेची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. अखिल गोवा मोटरस्पोर्टस असोसिएशनला गोवा क्रीडा प्राधिकरणाची संलग्नता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.