
वाळपई: शिक्षण खात्याच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार सत्तरी तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या पूर्वप्राथमिक वर्गांमुळे अंगणवाड्यांवर मोठे संकट ओढवले आहे. मागील शैक्षणिक वर्षात सत्तरी तालुक्यातील ३६ ठिकाणी हे वर्ग सुरू करण्यात आले, ज्यामुळे संबंधित भागातील अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. येत्या शैक्षणिक वर्षात हे प्रमाण वाढल्यास अनेक अंगणवाड्यांच्या अस्तित्वावरच गंडांतर येण्याची शक्यता आहे.
शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत सुरू केलेल्या पूर्वप्राथमिक वर्गांमुळे अंगणवाड्यांच्या पटसंख्येत मोठी घट झाली आहे. वाळपई बाल व महिला कल्याण खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी ३० पेक्षा अधिक मुले असलेल्या काही अंगणवाड्यांमध्ये आता केवळ १० पेक्षा कमी मुले शिल्लक राहिली आहेत. पालक मुलांना अधिक शैक्षणिक पर्याय असलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांमध्ये दाखल करत आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
अंगणवाड्यांमध्ये मुलांच्या विकासावर भर दिला जातो. त्यांना संतुलीत आहार, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक तयारी करून घेतली जाते. मात्र, सरकारच्या धोरणामुळे अंगणवाड्यांतील मुले या नव्या वर्गांकडे वळल्याने पटसंख्या घटत आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या ३६ पूर्वप्राथमिक वर्गांचा थेट परिणाम तेवढ्याच अंगणवाड्यांवर झाला आहे.
सरकारने नवीन धोरण लागू करताना अंगणवाडी यंत्रणेचा समावेश करून योग्य समन्वय साधायला हवा होता, असे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सत्तरी तालुक्यात पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याचा निर्णय अंगणवाड्यांवर संकट आणणारा ठरतो आहे. सरकारने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा अंगणवाड्या आणि त्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवांचा लाभ घेणारी कुटुंबे यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे अंगणवाडी शिक्षिका आणि साहाय्यिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अंगणवाड्या बंद पडल्यास त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. अनेक अंगणवाडी शिक्षिकांनी सरकारकडे या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
पूर्वप्राथमिक वर्गांमुळे अंगणवाड्यांवरील दबाव वाढला आहे. जी मुले अंगणवाडीत येऊ शकतात, त्यांनाच पूर्वप्राथमिक वर्गांमध्ये घेण्यात येत आहे. याचा थेट परिणाम अंगणवाड्यांच्या अस्तित्वावर होत आहे.
दीप्ती परब, प्रकल्प अधिकारी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.