Goa Politics: खरी कुजबुज; मनोज माघार घेणार?

Khari Kujbuj Political Satire: शनिवारी मेरशी बगलरस्‍त्यावर ट्रकमधून दारूचे १ हजार खोके पकडले आहेत. एका खोक्यात दारूच्या प्रत्येकी ४८ बाटल्या आहेत. बेळगावला ही दारू नेली जात होती.
Goa Latest Political News
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

दारूला फुटले पाय!

कर्नाटकात व महाराष्ट्रात नेली जाणारी दारू तेथील अबकारी यंत्रणा, पोलिस पकडतात. गोव्याच्या हद्दीतून ही दारू नेली जाताना सीमेवरील पोलिस, अबकारी कर्मचाऱ्यांना ती कशी सापडत नाही, हा मोठा प्रश्न आहे. असे असले तरी पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करून शनिवारी मेरशी बगलरस्‍त्यावर ट्रकमधून दारूचे १ हजार खोके पकडले आहेत. एका खोक्यात दारूच्या प्रत्येकी ४८ बाटल्या आहेत. बेळगावला ही दारू नेली जात होती. रंगकाम करण्यापूर्वी भिंतीवर लावण्याच्या पुट्टीच्या पोत्यांमागे हे खोके दडवण्यात आले होते. इतके दिवस दारू राज्याच्या हद्दीत न सापडणाऱ्या यंत्रणेला आताच का कारवाई करावीशी वाटली याची एक वेगळी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. ∙∙∙

हरमलातील ड्रोन दादागिरी

सध्या किनारी भागात विशेषतः पेडणे तालुक्यातील जमीनमालकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणी गेला तर स्थानिक अडथळा निर्माण करून शकतात, या शक्यतेने ड्रोनचा वापर यासाठी करण्याची शक्कल लढवण्यात येत आहे. हरमल येथे शुक्रवारी असा प्रकार उघडकीस आला. डोंगराळ भागात कोणीतरी ड्रोन उडवताना काहींनी पाहिले. त्यांना जमीन मोजणी, पाहणीचा हा प्रकार लक्षात आला. ते जमून तेथे जाईपर्यंत ड्रोनवाले गायब झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांना पकडलेच आणि पोलिसांपर्यंत प्रकरण नेले. यामुळे जमीन विकत घेणाऱ्यांची मजल कुठवर पोहोचली आहे, याचे हे उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. ∙∙∙

बेतकी-खांडोळ्यातही ‘राजकारण’?

या ‘झेडपी’ निवडणुकीत मगो-भाजप युती आहे म्हणून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसत आहे. कुर्टी ‘झेडपी’सारखेच बेतकी-खांडोळ्यातही ‘मगो’ वेगळी चूल थाटण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्टपणे प्रतीत होत आहे. भोम पंचायतीचे सरपंच सुनील भोमकर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असले तरी परवा त्यांच्या प्रचाराच्या मुहूर्ताला असलेली मगो कार्यकर्त्यांची गर्दी पाहता एका वेगळ्याच राजकारणाचा वास यायला लागला आहे. भोमकर हे ‘मगो’ अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून गणले जात असल्यामुळे या भागात एका वेगळ्याच ‘अँगलने’ चर्चा सुरू असल्याची ऐकायला मिळत आहे. भाजपने विद्यमान ‘झेडपी’ श्रमेश भोसले यांनाच परत उमेदवारी दिल्यामुळे आणि ते प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांचे समर्थक असल्यामुळे भोमकरांची उमेदवारी म्हणजे गोविंदना शह देण्याचा अप्रत्यक्षरीत्या प्रयत्न तर नव्हे ना, असेही बोलले जात आहे. दीपक या ‘झेडपी’ निवडणुकीतून गोविंदना ‘चेकमेट’ देण्याचा प्रयास करत आहेत, अशीही चर्चा सुरू आहे. आता खरे-खोटे दीपकच जाणोत. पण या ‘झेडपी’ निवडणुकीमुळे पडद्यामागचे राजकारण बरेच रंगायला लागले आहे. एवढे मात्र निश्चित. ∙∙∙

‘आरजी’ला इकडे आड-तिकडे विहीर!

बैठकीचे निमंत्रण देऊनही ‘आरजी’चे नेते वेळेत न पोहोचल्याने उलट-सुलट चर्चेला सुरवात झालीच. काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासमवेत गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे बैठकस्थळाकडे रवाना झाले तरीही ‘आरजी’चे नेते दिसले नाहीत, त्यामुळे चर्चा तर होणारच. शिवाय ‘आरजी’चे नेते मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांनी दोन दिवसांपासून जी शाब्दिक चिखलफेक केली आहे, त्याकडेही काँग्रेसने दुर्लक्ष केले आणि युतीचा ‘हात’ कायम ठेवला. मागील काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनोज परब यांना युतीविषयी जे काही सुनावले आहे, त्यावरून ‘एकला चलो’ची भूमिका स्वीकारावी की पक्षाच्या भविष्याचा विचार करून ‘युती’त जावे, हा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यापुढे ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी द्विधास्थिती निर्माण झाली असणार हे नक्की. ∙∙∙

विरोधी आघाडीचा गोंधळात गोंधळ

गोव्यात भाजपला रोखण्यासाठी गेल्या दिवाळीपासून होऊ घातलेली विरोधी पक्षांच्‍या आघाडीचे कोडे अजूनही पूर्णत: सुटलेले नाही. या आघाडीला सत्ताधारी भाजपची नजर तर लागली नाही ना, असा सवाल विचारला जात आहे. आजच्‍या बैठकीला ‘आरजी’चे नेते पोहोचले, पण खूप उशिरा. याचाच अर्थ अजूनही सर्व काही आलबेल नाही. युतीबाबतचे चित्र उद्या स्‍पष्‍ट होणार असले तरी भाजपच्या एकंदर कारभाराबाबत संतप्त असलेल्या अनेकांचा या घडामोडींमुळे विरस मात्र नक्कीच झाला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला व नंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या वाढदिवसाला सर्व विरोधी नेते व्यासपीठावर एकत्र येऊन, सर्वांनी हात उंचावून केलेल्या घोषणा हवेतच विरून जाणार की काय? पण नेमके काय घडले त्याचे उत्तर मात्र अजून मिळालेले नाही. खरे म्हणजे युरीबाबांच्या वाढदिवसानंतर संबंधित नेत्यांनी जागा वाटून घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती. पण अनेकांनी अगोदरच आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करून प्रचारही सुरू केला व तेथेच कलह सुरू झाला. मुहूर्तालाच कुजका नारळ निघाला की असेच होते म्हणतात. ∙∙∙

भाटलेवासीयांचा ‘धूळ सामना’

सध्या भाटले परिसरात रस्त्यावरून उडणारी धूळ नाकातोंडात घेत प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर डांबर कधी पडेल याची अनेकांना प्रतीक्षा आहे. भाटलेला टेकून असलेल्या आल्तिनो भागात चकाचक रस्ते असताना त्यावर डांबराचा आणखीन एक थर घालण्यात आला. भाटलेतील रस्त्याकडे मात्र लक्ष दिले जात नाही, असे चित्र आहे. त्यामुळे भाटलेवासीयांना धूळ खाण्यास भाग पाडण्याचा विडा कोणी उचलला आहे का, अशी विचारणा होऊ लागली आहे. ∙∙∙

‘इंडिगो’चा लग्नावरही परिणाम

मागील चार-पाच दिवसांपासून ‘इंडिगो’च्या विमानसेवा रद्द झाल्याने देशभरात गोंधळ निर्माण झाला आहे. गोव्यासारख्या पर्यटन राज्यालाही त्याचा फटका बसला आहे. विशेष बाब म्हणजे ‘इंडिगो’च्या सध्याच्या संकटात एका दूरच्या नातेवाईकाचे लग्न कसे पुढे ढकलावे लागले याची माहिती ‘फिनट्रेक कॅपिटल’चे संस्थापक अमित कुमार गुप्ता यांनी समाजमाध्यमांतून दिली आहे. एकाच विमानाने दिल्लीहून गोव्याला जाण्यासाठी ४८ पाहुण्यांचे बुकिंग करण्यात आले होते, ते अखेर रद्द करण्यात आले, ज्यामुळे कुटुंबाला लग्नाचा बेत गुंडाळावा लागला. विशेष बाब म्हणजे डिसेंबरमध्ये विवाहस्थळ उपलब्ध न झाल्याने जानेवारीत हा लग्नसोहळा करण्याचे निश्चित करून तो आता दिल्लीतील ‘एनसीआर’मध्ये होणार आहे. यावरून ‘इंडिगो’ने लोकांच्या जीवनाशी कसा खेळ केला, हेच यावरून स्पष्ट होते. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: सांताक्रुझ, शिरोडा, हणजूणवरून अडले युतीचे घोडे! ठाकरेंची सरदेसाई, परब यांसोबत बैठक; काय होणार घोषणा? राज्याचे लक्ष

अंडे का फंडा!

राज्यात नाताळानिमित्त अंड्यांना मागणी वाढली आहे आणि वर्षपरंपरागत यंदाही डिसेंबर महिन्यात अंड्याचे दर वाढत आहेत. सर्वसामान्यपणे दरदिवशी सुमारे सात ते आठ लाख अंडी गोव्यात फस्त होतात, अशी माहिती आहे. परंतु यातील ९० टक्के अंडी ही परराज्यातून गोव्यात आयात केली जातात. परराज्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अंड्यांसाठी अवलंबून राहिल्यामुळे दरवाढ आणि प्रसंगी तुटवड्यालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे राज्यात कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देऊन अंड्यांची गरज भागवण्यासाठी सरकारने अधिक प्रोत्साहन द्यावे, अशी मागणीही ग्राहकांतून होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना अंडी उत्पादनाचा खरा फंडा कळाला आहे आणि आपला गोवा मात्र दरवाढीने त्रस्त आहे. ∙∙∙

Goa Latest Political News
Goa Politics: ''पाटकरांनी जबाबदारी घेतली नाही'',वीरेश बोरकर यांचा आरोप; काँग्रेसच्या 'उद्या'मुळे युतीचा खेळ खल्लास

मनोज माघार घेणार?

जिल्‍हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आरजी’ या दोन पक्षांमध्‍ये युती आणि जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच दोन्‍हीही पक्षांनी आपापल्‍या उमेदवारांच्‍या प्रत्‍येकी दोन याद्या जाहीर केल्‍या. त्‍यामुळे युतीबाबत संभ्रम पसरलेला असतानाच ‘आरजी’चे अध्‍यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्‍या भेटीला गेल्‍याने या दोन पक्षांत नेमके काय चाललेय? असा प्रश्‍‍न दोन्‍ही पक्षांच्‍या कार्यकर्त्यांना पडला आहे. शनिवारच्‍या बैठकीत काँग्रेसने आम्‍हाला नवा प्रस्‍ताव दिलेला आहे. त्‍याबाबत पक्षाच्‍या नेत्‍यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार असल्‍याचे मनोज परब यांनी पत्रकारांना सांगितले. परंतु, उमेदवार जाहीर केल्‍यानंतर ते आपली भूमिका आणि निर्णयावरून माघार घेणार का? याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com