फोंडा : कुर्टी-फोंडा येथील नवीन हाऊसिंग बोर्ड कॉलनीत भर लोकवस्तीत आणि विद्यालयाच्याजवळच बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जोरदार हालचाली चालल्या आहेत. गोवा हाऊसिंग बोर्डची जागा असली तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने स्वतः ना हरकत दाखला दिल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. हा मोबाईल टॉवर उभारण्यासाठी लोकांनी तीव्र विरोध केला असून सर्व संबंधितांना शुक्रवारी निवेदने सादर केली आहेत. मोबाईल टॉवर उभारा पण तो भरवस्तीत आणि मोकळ्या सोडलेल्या जागेत नको, रस्त्याच्या कडेला घाला असेही येथील नागरिकांनी सांगितले.
कुर्टी नवीन हाऊसिंग बोर्ड कॉलनीत खुली जागा अगोदरच सोडण्यात आली आहे. या खुल्या जागेत मनोरंजनात्मक अथवा सामाजिक उपक्रम साकार करायचे असतात. या जागेच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम खात्याला पाण्याची टाकी बांधण्यासाठी तात्पुरती जागा देण्यात आली, पण मालकी हक्क गोवा हाऊसिंग बोर्डकडे असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने एका खाजगी कंपनीला टॉवर उभारण्यासाठी नाहरकत दाखला गेल्या 31 मे रोजी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी संबंधित खाजगी कंपनीचा कंत्राटदार मोबाईल टॉवर उभारण्यासाठी मशिनरी व कामगार घेऊन आला असता स्थानिकांनी काम रोखले, प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. शेवटी पोलिसांनी कंत्राटदाराला कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासंबंधी बजावले. तरीपण आता जबरदस्तीने हा मोबाईल टॉवर उभारण्याचे घाटत असल्याने शुक्रवारी स्थानिकांनी सर्व संबंधित खाते तसेच पोलिसांना निवेदन देऊन प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गोवा हाऊसिंग बोर्डकडून आक्षेप!
गोवा हाऊसिंग बोर्डच्या ताब्यातील जमिनीत बेकायदेशीरपणे मोबाईल टॉवर उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने परस्पर दिलेला नाहरकत दाखला त्वरित रद्द करण्यासाठी गोवा हाऊसिंग बोर्डच्या कार्यकारी अभियंत्याने गेल्या 15 जून रोजी सार्वजनिक बांधकाम खाते विभाग अठराला पत्र दिले आहे. या जागेत मोबाईल टॉवर उभारण्यास गोवा हाऊसिंग बोर्डचा तीव्र आक्षेप असून त्वरित दाखला रद्द करावा असे या पत्रात म्हटले आहे.
खुली जमीन पंचायतीच्या ताब्यात देणार!
नवीन हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील ही खुली जागा कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे सोपस्कार सुरू असून या मोकळ्या जागेत सामाजिक उपक्रम साकारण्यासाठी नियोजन आहे. या ठिकाणी विद्यालय सुरू असल्यामुळे मोबाईलच्या घातक रेंजमुळे आरोग्यावर विपरित परिणामही होऊ शकतात त्यामुळे बेकायदेशीररीत्या एखादा मोबाईल टॉवर उभारण्यास येथील नागरिकांनी तीव्र विरोध असल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या बाजूला गोवा हाऊसिंग बोर्डनेही हा मोबाईल टॉवर उभारण्यासाठीची कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
रस्त्याच्या कडेच्या जागेचा वापर करा
मोबाईल उभारण्यासाठी मोकळ्या सोडलेल्या जागेचा नव्हे तर रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेचा वापर करा, असे मत या भागाचे माजी सरपंच शैलेश शेट तसेच कॉलनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विद्यालय आणि नागर वस्ती असल्याने या भर वस्तीतच मोबाईल टॉवर उभारणे कितपत योग्य आहे, शिवाय जागाही गोवा हाऊसिंग बोर्डची आहे, मग हा प्रकार कसा काय चालतो, असा सवाल कॉलनीतील रहिवाशांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.