वाळपई,
ही संस्था म्हणजे राज्यातील नव्या पिढीचे भवितव्य घडवणारी आहे, असे प्रतिपादन गुळेली पंचायतीचे माजी सरपंच विशांत नाबर यांनी केले. वाळपई येथे आज आयआयटी संस्थेच्या समर्थनार्थ गुळेली पंचायत भागातील नागरिकांनी पत्रकार परिषद घेऊन तसा दावाही केला आहे.
विशांत नाबर पुढे म्हणाले, की ही संस्था विद्यादान देणारी चांगली शैक्षणिक संस्था आहे. त्यातून भौगोलिक दृष्ट्याही विकासाला चालना मिळणार आहे. विद्या म्हणजेच सरस्वती देवी आहे. तिचे सत्तरीत स्वागतच केले पाहिजे. हीच उच्च शिक्षण प्राप्त करण्याची मोठी संधी मिळाली आहे. संकुचित विचारांनी संस्थेला विरोध करणे चुकीचे आहे.
अजीत देसाई म्हणाले, की जे लोक संस्थेला विरोध करतात, त्यांनी सकारात्मक विचार केला पाहिजे. ही जागतिक दर्जाची संस्था आहे. विशेष करून सत्तरी तालुक्यातील आत्ताच्या पिढीचे पालक इच्छुक मुलांना पाचवीपासूनच या शिक्षणासाठी तयारीला लागणार आहेच. सद्यस्थितीत सत्तरीतील शाळांचा चांगला निकाल लागून दहावीत, बारावीतील मुले मुली ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होत आहेत. त्यामुळे ज्यांनी उच्च शिक्षणाची स्वप्ने रंगविली आहेत. त्यांना पाचवीपासून तयारी करण्यास संधी मिळणार आहे. जे लोक विरोध करतात त्यांनी जमिनींचा विषय सरकार दरबारी मांडला पाहिजे.
श्याम सांगोडकर म्हणाले, की आपण मुरमुणे गावचा असून आपले कुटुंब या सरकारी जमिनीत उत्पन्न घेत आले आहे. ज्यांच्या उत्पन्नाच्या जमिनी संस्थेत जातात त्या सुमारे अकरा जणांनी सरकार दरबारी फाईल देऊन आपापल्या मागण्या मांडलेल्या आहेत, पण काहीजण विरोध करतात त्यांच्या जमिनी संस्थेच्या जागेत नाहीत.
रोहीदास गावकर म्हणाले, की या संस्थेमुळे सत्तरी तालुक्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय होणार आहे. या ६७/१ सव्हे क्रमांकाच्या जागेत ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांना त्याचा मोबदला देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, पण कोणीही विरोधासाठी विरोध करू नये. आशिष देसाई यांनीही यावेळी संस्थेच्या समर्थनात विचार मांडले. यावेळी आत्माराम देसाई, लवू गावकर, विनायक देसाई, दशरथ नाईक, प्रकाश नाईक, निवास गावडे, लक्ष्मण मेळेकर, रामा म्हावळींगकर, उमेश कासकर, उत्तम मेळेकर, सुकडो मेळेकर, संतोष गावडे, नवनाथ उसगावकर, विशाल नाईक, दशरथ नाईक, पांडू उसपकर, विराज सांगोडकर, संदीप देसाई यांची उपस्थिती होती.
संपादन - यशवंत पाटील
|