कळंगुट: वाडी -कांदोळी येथील समुद्र किनाऱ्यालगतच्या जमिनीत असलेली शेकडो लिंगुडाच्या झाडांची अज्ञातांकडून कत्तल करण्यात आल्याची माहिती कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांनी दिली. याभागात व्यवसाय थाटलेल्या तसेच राजकीय आश्रय लाभलेल्या परप्रांतीय व्यावसायिकांचा या कत्तलीमागे हात असल्याचेही त्यांनी सांगितले.
कांदोळी पंचायत क्षेत्रातील सर्वे क्र: 209/9 आणि 209/1 मधील समुद्र किनाऱ्यालगतच्या जमिनीत पूर्वापार असलेली तसेच जमिनीची धूप रोखणारी लिंगुडाची शेकडो झाडे रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत अज्ञातांनी कापून नष्ट केली. या प्रकारामुळे नैसर्गिक संपतीची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे याभागाचा दौरा केला असता दिसून आले. दरम्यान, वाडी- कांदोळी समुद्रालगतची लिंगुडाची झाडे रातोरात नष्ट झाल्याची माहिती मिळताच कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर तसेच इतरांनी घटनास्थळाला भेट देऊन परिसराची पाहाणी केली. या प्रकाराची माहिती त्यांनी स्थानिक पंचायत मंडळाला दिली, तसेच संबंधित वन खाते तसेच पर्यावरण मंडळाच्या कार्यालयात यासंबंधी रितसर तक्रार दाखल केली.
संबंधित खात्याकडून या प्रकरणाचा योग्य रितीने तपास करून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी फोरमने केली आहे. याप्रकरणात संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून न्याय न मिळाल्यास मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू,असा इशारा यावेळी कळंगुट फोरमने दिला आहे.
झाडांची कापणी करून याभागातील जमीन बळकावण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून या भागात परप्रांतीय व्यावसायिकांकडून सुरू आहे.त्याचप्रमाणे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही व्यावसायिक खुलेआम झाडांची कत्तल करत असल्याने राज्यात कायदा अस्तित्वात आहे,की नाही, असा सवाल उपस्थित होत असल्याची शंका आहे.
-संजना नाईक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.