सत्तरी तालुक्यात म्हादईच्या जंगलाला विविध ठिकाणी डोंगराळ भागात भयानक आग लागून जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. आता आग नियंत्रणात आलेली आहे. या आपत्कालीनप्रसंगी सत्तरी तालुक्यातील तमाम जागरूक सेवाभावी नागरिकांनी माणुसकीचे नाते प्रस्थापित करीत म्हादईला लागलेला वणवा रोखण्यासाठी योगदान दिले आहे.
माळोली म्हादई वन विभागाचे वनाधिकारी गिरीश बैलुडकर, वरिष्ठ वन अधिकारी परेश परब, ट्रेकर्स, कर्मचारी, फॉरेस्ट गार्ड आदींनी देखील यासाठी गेले दहा दिवस जीवाचे रान करीत दिवसरात्र आग शांत करण्याचे अतुलनीय काम केले आहे.
सत्तरी तालुक्यात शनिवार, 4 रोजीपासून सर्वत्र आगीने थैमान घातलेले होते. आता आग नियंत्रणात आहे. पण जळालेल्या लाकडांतून धूर अजूनही काही ठिकाणी दिसून येतो आहे.
साट्रे, देरोडे, मोर्ले, केरी, चरावणे, चोर्ला, वाघेरी परिसर, कोपार्डे, सुर्ला भाग या ठिकाणी डोंगरावर आगीने थैमान घातले होते. पश्चिम घाटातील जैवविविधतेने नटलेल्या सत्तरी तालुक्यातील या डोंगरांना आगीने विळखा घातलेला होता. ही आग विझविणे म्हणजे जीवावर बेतणारेच.
सध्या उष्णतेने उच्चांक गाठलेला असतानादेखील भर दुपारी तळतळत्या उन्हात चढत्या डोंगरावर हातात झाडांच्या फांद्या घेऊन जमिनीवरून पसरत असलेली आग विझविणे ही मोठी गोष्ट होती. या आपत्कालीन काळात लोकांनी केलेली मदत ही खरोखरच कौतुकास्पद म्हणावी लागेल.
जनसेवा लाखमोलाची
साट्रे गावचा गड म्हणजे उंच चढत्या स्वरूपाचा आहे. डोंगरावर सलेली दगडी खडी व त्यावर असलेल्या गवताला लागलेली आग आटोक्यात आणताना वन विभागाच्या कर्मचारी वर्गाच्या नाकीनऊ आले. सत्तरीतून अनेक लोकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून याप्रसंगी मदतीचा हात दिला त्याला तोडच नसावी. साट्रे, देरोडे, पेंडाळी, झाडानी आदी भागांत तळपायांना टोचलेले दगडगोटे, जळके निखारे यावरून पायी तुडवत केलेली जनसेवा लाखमोलाची ठरली आहे.
मदतकार्य सुरूच-
सोमवारी (ता.13) साट्रे, देरोडे, पेंडाळी आदी भागात हेलिकॉप्टरच्या मदतीने विझविलेली आग पूर्ण शांत करण्यासाठी पाण्याचा फवारा मारला गेला. आग नियंत्रणात असली तरी लाकडांतून धूर येतो आहे. सध्या मोठ्या प्रमाणात वारा वाहतो आहे. अशावेळी खबरदारी आवश्यक बनलेली आहे. म्हादई वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी विविध ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.