डिचोली: मये परिसरात मोकाट गुरांची (cattle attack) समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून, या मोकाट गुरांमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, अलीकडेच केळबायवाडा येथे रात्रीच्यावेळी मोकाट गायीने केलेल्या हल्ल्यात यशवंत कुबल या हॉटेल मालकाचे दोन्ही हात "फ्रॅक्चर" झाले आहेत.
मये पंचायत क्षेत्रातील बहूतेक सर्व भागात मोकाट गुरांची समस्या असली, तरी केळबायवाडा येथे ही समस्या अधिक जटील बनली. केळबायवाडा येथे दिवसरात्र रस्त्यावर गुरांचा संचार चालू असतो. रात्रीच्यावेळी तर गुरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून असतात. यामुळे बऱ्याचदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या या गुरांमुळे अधूनमधून लहानसहान अपघातही घडत असतात. रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावरही ही गुरे धावून जातात. या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पंचायतीने जातीने लक्ष घालून या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांकडून होत आहे.
हॉटेल मालक जखमी
एका मोकाट गायीने केलेल्या हल्ल्यात केळबायवाडा येथील हॉटेल चालक यशवंत कुबल हे जखमी होण्याची घटना अलीकडेच घडली आहे. रात्रीच्यावेळी यशवंत कुबल हे रस्त्यावरून चालत घरी जात असताना रस्त्यावर ठाण मांडलेल्या गुरांच्या कळपातील एका गायीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात त्यांचे दोन्ही हात मोडले आहेत. अजूनही मोडलेले हात गळ्यात बांधण्याची त्यांच्यावर पाळी आली आहे.
नशीब म्हणून वाचलो
आमच्या या प्रतिनिधीने गायीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या यशवंत कुबल यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण हल्ल्यातून बचावलो. असे त्यांनी सांगितले. नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून आपण घरी जात असता, अचानक एक धावून आली आणि तिने आपल्यावर हल्ला चढवला. त्यामुळे तोल जावून आपण पडलो आणि दोन्ही हात मोडले. तेव्हापासून व्यवसायावर पाणी सोडावे लागले आहे. ऐन चतुर्थीतही गळ्यात हात बांधूनच राहण्याची पाळी आपल्यावर येणार आहे. असे श्री. कुबल यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.