Srinivas Naik Firing Case: हॉटेलच्या वादातून घडला गोळीबार? मुंबईत गोवा पोलिसांची 2 पथके तळ ठोकून; तपास अखेर 'क्राईम ब्रॅंच'कडे, मुख्यमंत्र्यांची माहिती

Srinivas Naik Shooting Case Goa: ‘निओ मॅजेस्टिक’चे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी पोलिसांनी जुन्या व्यावसायिक वैमनस्याच्या दृष्टीने तपास तीव्र केला आहे.
Srinivas Naik Shooting Case Goa
Srinivas Naik Firing CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘निओ मॅजेस्टिक’चे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी पोलिसांनी जुन्या व्यावसायिक वैमनस्याच्या दृष्टीने तपास तीव्र केला आहे. या तपासात पणजीतील एका हॉटेलशी संबंधित जुना वाद आणि त्यातील नायक यांची भूमिका पोलिसांच्या संशयाच्या कक्षात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी गोवा पोलिसांची दोन पथके मुंबईत दाखल झाली असून, ती अजूनही तेथेच तळ ठोकून आहेत.

हॉटेलशी संबंधित एका न्यायालयीन वादात नायक यांनी ‘गोल्डन पीस हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’चे अधिकृत प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला होता. एप्रिल २०२६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ‘गोल्डन पीस हॉस्पिटॅलिटी’चा दावा फेटाळताना या वादातील व्यवहार आणि मालमत्तेवरील हक्कासंदर्भात महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली होती. त्यामुळे या गोळीबारामागे या वादाची काही पार्श्वभूमी आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ही पथके मुंबईत विविध मार्ग आणि तपासाचे धागेदोरे शोधत आहेत.

याच पार्श्वभूमीवर व्यावसायिक संबंध, व्यवहारातील भूमिका, तसेच त्यातून निर्माण झालेले संभाव्य आर्थिक वा व्यावसायिक मतभेद पोलिस बारकाईने तपासत आहेत. मात्र, या जुन्या वादाचा नायक यांच्यावरील हल्ल्याशी थेट संबंध असल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही आणि पोलिसांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी नायक यांच्यावर कॅसिनोबाहेर अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारामुळे दोघेही सुदैवाने बचावले. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून, हा हल्ला केवळ धमकावण्यासाठी होता की त्यामागे व्यावसायिक शत्रुत्व आहे, याचा शोध मुंबईत दाखल असलेली पथके व स्थानिक पोलिस घेत आहेत.

तपास अखेर ‘क्राईम ब्रॅंच’कडे

‘मॅजेस्‍टिक’चे संचालक श्रीनिवास नायक यांच्‍यावर शुक्रवारी झालेल्‍या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्‍हे अन्‍वेषण विभागाकडे (क्राईम ब्रॅंच) देण्‍यात आला आहे, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभा सभागृहात स्‍पष्‍ट केले. आमदार विजय सरदेसाई यांनी याविषयावरून स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com