म्हापशातील ऐतिहासिक ग्रंथालय बंदच!

उदासीनता: अडीच वर्षांपासून पालिकेकडून सुरू होईना इमारतीचे दुरुस्तीकाम
आथाइद पालिका ग्रंथालय
आथाइद पालिका ग्रंथालयDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: दुरुस्तीचे कारण पुढे करून म्हापसा पालिका ग्रंथालय गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून बंदच आहे. या ग्रंथालयाची इमारत कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे ग्रंथालय व यापूर्वी जनतेसाठी उपलब्ध असलेला तेथील वाचन कक्षही 13 सप्टेंबर 2019 पासून पूर्णत: बंदच असून, वाचकांसाठी पालिकेने इतरत्रही सोय केलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे या इमारतीचे दुरुस्तीकाम अद्याप सुरू झालेले नाही.

स्वखर्चाने या ग्रंथालयाची निगा व देखभाल करणे शक्य न झाल्याने हे ग्रंथालय गोवा सरकारच्या कला व संस्कृती खात्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय म्हापसा पालिकेने घेतला होता. परंतु त्यासंदर्भात सरकारने कोणतेही सोपस्कार पूर्ण न केल्याने आता पालिकेने स्वखर्चाने त्या इमारतीचे दुरुस्तीकाम हाती घेण्याचे ठरवले आहे.

आथाइद पालिका ग्रंथालय
गोव्यातील कामगारांना उच्च शिक्षणाची संधी...

गेल्या वर्षभरापूर्वी म्हापसा पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी क्लेन मदेरा यांनी कार्यालयातील अन्य अधिकाऱ्यांसमवेत या दुरुस्तीकामासंदर्भात अंदाजे खर्चाबाबत अहवाल तयार केला आहे; तथापि, या ग्रंथालयाची दुरुस्ती व जिल्हा ग्रंथालयाचा दर्जा देणे यासंदर्भात राज्य सरकारच्या पातळीवर कोणताही पाठपुरावा झाला नाही.

‘गोवा कॅन’चे संघटक रोलंड मार्टिन्स यासंदर्भात म्हणाले, सध्या पावसाळा जवळ आल्याने व त्या इमारतीचे दुरुस्तीकाम करणे आवश्यक आहे.

मंत्री गोविंद गावडे यांनी दोन वर्षांपूर्वी सुचवल्याप्रमाणे तेथील पुस्तके अन्य ठिकाणी एखाद्या शासकीय इमारतीत स्थलांतरित करणे शक्य आहे. लोकप्रतिनिधींची आश्‍वासनेही हवेत विरली आहेत. त्यामुळे सरकारने आता यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

आथाइद पालिका ग्रंथालय
होंड्यात होणार कचरा प्रकल्पाचे आज उद्घाटन

या लोकप्रतिनिधींची आश्‍वासने हवेत विरली

1) ग्रंथालयाच्या इमारतीचे दुरुस्तीकाम राज्य सरकारतर्फे करून या ग्रंथालयाला जिल्हा ग्रंथालयाचा दर्जा देण्याचे आश्वासन सुमारे अडीच वर्षापूर्वी कला व संस्कृती खात्याचे तत्कालीन मंत्री गोविंद गावडे यांनी म्हापशात येऊन ग्रंथालयाची पाहणी केल्यानंतर दिले होते.

2) ऑगस्ट 2020 मध्ये स्वातंत्र्यदिन सोहळ्यात म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी स्पष्ट केले होते, की या ग्रंथालयाचे दुरुस्तीकाम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत 30 डिसेंबर 2020 नंतर सुरू होईल. परंतु, सरकारकडे निधी नसल्याने ते काम रखडले आहे. त्यामुळे पालिकेने स्वत:च्या निधीतून ते दुरुस्तीकाम करण्याचे ठरवले आहे.

3) म्हापसा शहरातील वाचकांसाठी तात्पुरता वाचनकक्ष कदंब बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या दोन गाळ्यांत उभारण्याचे आश्वासन दोन वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी दिले होते; पण, त्याबाबतही पुढे काहीच झाले नाही. कोरोनाचे कारण पुढे करत ग्रंथालयाचे दुरुस्तीकाम प्रलंबित ठेवण्यात आले, अशी टीका वाचकांमधून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com