Mapusa Cylinder Blast : म्हापशातील बार-रेस्टॉरंटमध्ये उच्च तीव्रतेचा स्फोट

बारमधील एसी, फ्रिजमधील गॅस किंवा सिलिंडरमधील नेमका कोणत्या गॅसचा स्फोट झाला, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
Mapusa Cylinder Blast
Mapusa Cylinder Blast Dainik Gomantak

Mapusa Cylinder Blast: डांगी-कॉलनीमध्ये रविवारी पहाटे ब्रीझ अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील बार-रेस्टॉरंटमध्ये कथित गॅस गळतीमुळे जबरदस्त स्फोट झाला. मात्र, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.

कारण येथील सिलिंडरचा स्फोट झालेला नाही. त्यामुळे बारमधील एसी, फ्रिजमधील गॅस किंवा सिलिंडरमधील नेमका कोणत्या गॅसचा स्फोट झाला, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

डांगी-कॉलनीमधील रहिवासी साखर झोपेत असतानाच पहाटे साडेपाचच्या सुमारास जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, बारशेजारील काही घरांच्या भिंतींना तडे गेले, तर काहींची काचेची तावदाने फुटली. सुदैवाने जीवितहानी टळली

मात्र, या प्रकारामुळे आज दिवसभर परिसरात घबराट निर्माण झाली होती. या प्रकरणात घातपाताचा संशय बारमालकाने व्यक्त केला असला, तरी पोलिसांनी ही शक्यता फेटाळली आहे.

आज सायंकाळी बॉम्बशोधक पथक व फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली. बार-रेस्टॉरंटच्या मालक प्रमिला मयेकर यांनी याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

या दुर्घटनेत अडीच लाखांचे नुकसान झाले असून पाच लाखांची मालमत्ता वाचविली, असे अग्निशमन दलाने सांगितले. या स्फोटात चार चारचाकी तर तीन दुचाकींचे नुकसान झाले. शिवाय सात घरांनाही फटका बसला.

पहाटे 5.53 च्या सुमारास या घटनेची माहिती म्हापसा अग्निशमन दलास मिळताच दलाचे जवान घटनास्थळी पोचले. स्फोट झाल्याने ‘हिल-टॉप’ बार-रेस्टॉरंटच्या बाहेरील काही वाहनांना आग लागली होती. स्थानिक व जवानांनी आग शमवली.

त्यानंतर बारमध्ये प्रवेश करून जवानांनी तेथील आग विझवली. स्वयंपाक खोलीमध्ये शेगडीला जोडलेल्या सिलिंडरचा रेग्युलेटर नॉब बंद केला आणि दोन सिलिंडर बाहेर काढले. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून याची नोंद केली.

- शेजाऱ्यांच्या भिंतींना तडे

बार-रेस्टॉरंटच्या पलीकडे रेषा मांद्रेकर यांच्या फ्लॅटच्या भिंतीला मोठे तडे गेले आहेत. तसेच घरातील साहित्य व स्वयंपाक खोलीतील भांडी अस्ताव्यस्त पडली.

काहींच्या घरातील भिंतींवर लावलेल्या पेंटिंग फ्रेम खाली पडून फुटल्या. या दुर्घटनेमुळे नुकसान झाल्याने प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी मांद्रेकर यांनी केली आहे.

Mapusa Cylinder Blast
Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ, जाणून घ्या आजचे दर

- सिलिंडर शाबूत, मग स्फोट कसा?

या बारमधील एअर कंडिशनरला स्टॅबिलायझर नव्हता. येथील एसी, सिलिंडर किंवा फ्रिजच्या कॉम्प्रेसरला गळती लागल्यामुळे हा प्रकार घडला का? अशा वेगवेगळ्या बाजूंनी आता सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत.

रविवारी रात्री उशिरापर्यंत या स्फोटाचे नेमके गूढ समजू शकले नाही. पोलिसांकडून बारमधील दोन सिलिंडर तपासणीसाठी पाठविले आहेत.

Mapusa Cylinder Blast
Goa Crime: कळंगुट, असोळणा येथे 12.20 लाखांचे ड्रग्ज जप्त

नियमाचे उल्लंघन...

या बार-रेस्टॉरंटकडे रात्री 11 वाजेपर्यंतचा परवाना आहे. मात्र, दुर्घटना झाली त्यावेळी बार मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत सुरू होता, हे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले.

त्यामुळे या बारचा अबकारी परवाना निलंबित करावा, असे पत्राद्वारे संबंधितांना कळविणार, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिली. बारचालकाकडून व्यावसायिक ऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत होता. हा गुन्हा आहे, असेही दळवी म्हणाले.

Mapusa Cylinder Blast
Water Dispute: कळसा-भांडुराचे पाणी वळविण्याची गरजच नाही! - राजकुमार तोपन्नावर

बारमध्ये गॅस गळतीने स्फोट झाल्याचा संशय आहे. मात्र, तपासणीनंतरच नेमके कारण समजेल. गळती झाल्यामुळे बारमध्ये गॅसचे प्रमाण वाढले असावे.

बारचे दोन्ही शटर व एकमेव खिडकी बंद होती. त्यामुळे आत हवा जाण्यास वाट नव्हती. नंतर त्याचा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी सिलिंडरचा स्फोट झालेला नाही.

- जीवबा दळवी, पोलिस उपअधीक्षक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com