डिचोली: मुसळधार पावसामुळे डिचोलीतील काही खाणखंदकांतील पाणी वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘ऑरेंज अलर्ट’नुसार पावसाची संततधार कायम राहिल्यास खंदकांपासून आपत्ती ओढवण्याची भीती खाणपट्टा भागात व्यक्त होत आहे. (Heavy rains increased water in some of the mines in Bicholim; The question of the safety of citizens )
डिचोली शहराला जोडून दोन तर तालुक्यातील शिरगाव, मये, सुर्ल, वेळगे, पाळी, अडवलपाल या भागात खाणखंदक आहेत. पावसामुळे शहराच्या जवळील आधीच असुरक्षित असलेल्या लामगावच्या माथ्यावरील खाणखंदकातील जलसाठा वाढला आहे. डिचोलीचे मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांच्या नियंत्रणाखाली आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणाही तत्पर झाली असून, खाणखंदकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. जलदगतीने पाणी उपसा करण्याचे आदेशही खाण कंपन्यांना देण्यात आले आहेत.
पाणी उपशाबाबत साशंकता
खाणखंदकांवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना हाती घेताना खाणखंदकातील पाणी उपसा करावा असे निर्देश महिन्यापूर्वीच प्रशासनाने खाण कंपन्यांना दिले होते. मात्र, लामगावसह काही खाणखंदके भरल्याने पाणीउपसा केला की नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. डिचोली शहराला जोडून असलेल्या ‘धबधबा’ येथील अन्य एका खाणखंदकातून गेला महिनाभर पाणी उपसा करण्यात आला नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
‘गोमन्तक’ने आणली होती जाग!
गेल्या मे महिन्यात धबधबा खाण खंदकातील पाणी बाहेर सोडणे बंद होते. त्यासंबंधीचे वृत्त दै. ‘गोमन्तक’मधून प्रसिद्ध होताच मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा पाणीउपसा सुरू करण्यात आला. मात्र चार-पाच दिवसांनी पुन्हा हे काम बंद पडले, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, गेला महिनाभर खंदकातून पाणीउपसा बंद असल्याची माहिती असतानाच, आज मंगळवारी पहाटे साधारण अर्धा तासभर खाणखंदकातून पाणी बाहेर सोडण्यात आले. नंतर मात्र सायंकाळपर्यंत पंपिंग बंदच होते, अशी माहिती मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.