पणजी: गुजरातच्या सौराष्ट्र जवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि मध्य महाराष्ट्राजवळ अवकाशात आलेला ऑफ शोर ट्रफ्स यांमुळे राज्यात मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्याने रविवार, 17 जुलै रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली असून वीज खात्यालाही मोठा फटका बसला आहे.
(Heavy Rain In Goa)
मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या अतिरिक्त भरतीमुळे दिवाडी आणि चोडणकडे जाणारे मांडवी किनाऱ्यावरील फेरीधक्के पाण्याखाली गेले. त्यामुळे फेरीसेवा विस्कळीत झाली. त्याचा मोठा फटका या भागातून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना विशेषत: शाळकरी मुलांना आणि प्रवाशांना बसला. आज शनिवार असल्यामुळे शाळेतून लवकर परतणाऱ्या मुलांना फेरीबोटीची वाट पाहात ताटकळत राहावे लागले. राज्यातील बऱ्याच नद्यांची पाणी पातळी वाढली. त्यात वाळवंटी नदीचाही समावेश आहे.
काणकोण तालुक्यात नद्या-नाले, ओढे, तुडुंब भरून वाहू लागले आहेत. गालजीबाग व तळपण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे त्या परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. चापोली धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहण्यासाठी अवघ्या ०.६२ मीटर पाण्याची गरज आहे. धरण जलाशयाची अच्युत्तम क्षमता ३८.७५ मीटर आहे तर सध्या जलाशयात ३८.१३ मीटर पाणीसाठा आहे.
कोसळधारेने केपेतील शेतकरी चिंतेत
शुक्रवारी रात्रीपासून पावसाने परत एकदा जोर धरल्याने केपे तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. गेले काही दिवस पाऊस थांबल्याने या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात केली होती, तर काहींनी लावणीलाही सुरुवात केली होती.
मडगाव न्यायालयात पुन्हा गळती
मडगाव न्यायालयाच्या जुन्या इमारतीत शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी सुधीर शिरगावकर यांच्या कक्षातच पावसाचे पाणी थेट आत येऊ लागल्याने सर्वांची तारांबळ उडाली. आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे कौलांवर घातलेले ताडपत्रीचे आवरण उडून गेले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.