वाळपई: अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले सायक्लॉनिक सर्क्युलेशन आणि तापमानात झालेली वाढ यांमुळे मॉन्सूनोत्तर पावसाने सत्तरी तालुक्याला जबरदस्त तडाखा दिला. कमी वेळेत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे (इन्टेन्स स्पेल) वाळपईत ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली. यामुळे गेल्या वर्षी जुलै महिन्यात आलेल्या महापुराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
(Goa Monsoon Updates)
वाळपईत अनेक घरांमध्ये पाणी शिरले. येथील मारुती मंदिरासमोरील दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले. त्यामुळे दुकानदारांची बरीच धांदल उडाली. पेडणे तालुक्यात निगळ-अमेरे येथे काही काळ पूरस्थिती होती. डिचोली तालुक्यालाही आज पावसाने झोडपले. राज्यात १५ व १६ रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास सत्तरी तालुक्यातील जनतेला जोरदार पावसाचा सामना करावा लागला. वादळी वारा व प्रचंड गडगडाटात दोन तास सत्तरी तालुक्याला पावसाने झोडपले. यामुळे वाळपईतील जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. मुसळधार पावसामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची तारांबळ उडाली. अनेक वाहने अडकून पडण्याच्या घटना घडल्या. अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. या पावसामुळे शेती- बागायतीचे नुकसान झाल्याच्या अंदाज वर्तविण्यात येत आहे. सत्तरी तालुक्यातील वेळूस, रगाडा व इतर नद्यांमधील पाण्याच्या पातळीत काहीशी वाढ झाली होती.
वाळपई सरकारी रुग्णालय व हनुमान मंदिर परिसर पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला. हनुमान मंदिरानजीकच्या घरांमध्ये पाणी शिरले. मात्र, कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. वाळपई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही ठिकाणी जीवितहानी व नुकसान झाले नाही.
वाळपई कोर्ट ते रुग्णालयादरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोन तास वाहने अडकून पडली होती. काहींनी या पाण्यातूनच वाट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अंगलट आला. दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडण्याच्या घटना घडल्या. स्थानिकांनी वाहनचालकांना मदत करून अडकलेली वाहने पाण्यातून बाहेर काढली. संध्याकाळी काही ठिकाणी पाणी भरले होते, त्या ठिकाणी पालिकेच्या कामगारांनी धाव घेऊन पाण्याचा निचरा केला. त्यामुळे अवघ्या दोन तासांमध्ये रस्त्यावरील पाणी कमी झाले.
40 मिनिटांत 70 ते 80 मि.मी. पाऊस
डॉप्लर रडारच्या अनुमानानुसार सत्तरी, डिचोली आणि सांगे या तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता होती आणि त्यानुसार सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. ढगांची घनता आणि हवामानानुसार वाळपईमध्ये अवघ्या ४० मिनिटांत ७० ते ८० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असावा, असे अनुमान आहे. कमी वेळेत जास्त पाऊस झाला. पण त्याचा विसर्ग होऊ शकला नाही. त्यामुळेच ही पूरस्थिती निर्माण झाली, असे वैज्ञानिक एम. राहुल म्हणाले.
डिचोलीत जोरदार पर्जन्यवृष्टी
शहरात आज सायंकाळी विजेच्या गडगडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे शेतकरीही चिंताक्रांत बनले आहेत. डिचोलीतील बहुतांश भागांत जोरदार पाऊस पडला. पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे डिचोली अग्निशामक दलाच्या कार्यक्षेत्रात दोन ठिकाणी झाडे कोसळली. मात्र, कोणताही अनर्थ ओढवला नाही, अशी माहिती अग्निशामक दलाकडून मिळाली.
आज, उद्या यलो अलर्ट
अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंघावत आहे. त्यासोबतच पश्चिमेकडून वारे वाहात असल्याने १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी मेघगर्जना आणि विजांसह मोठ्या प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सांगे, सत्तरी, डिचोली, पेडणे, धारबांदोडा तालुक्यांत मोठ्या पावसाची शक्यता असून किनारी भागातही पाऊस पडेल, असे वैज्ञानिक एम. राहुल यांनी सांगितले. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.