Goa Medical College: आराेग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणेंनी दिली गोमेकॉला नवसंजीवनी; कारभारात आणली शिस्त

टोकन पद्धतीमुळे गोंधळ संपला, रुग्‍णांना मोठा दिलासा; स्‍वच्‍छतेला देण्‍यात आलंय प्राधान्‍य, दररोज शेकडो कर्मचारी कार्यरत
Goa Medical College
Goa Medical CollegeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Medical College: आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी गोमेकॉच्‍या गचाळ कारभारात शिस्त आणण्यासाठी उचललेली पावले प्रशंसनीय आहेत. राज्यातील लाखो सर्वसामान्य नागरिकांचा आधार असलेले हे इस्पितळ. परंतु ओपीडीपासून कॅज्युअल्टीपर्यंत सर्वत्र भोंगळ कारभारच पाहायला मिळत होता.

‘वशिला किंवा ओळख असेल तरच गोमेकॉत जावे’ अशी त्यामुळे सर्वसामान्यांची धारणा बनली होती आणि ती बऱ्याच अंशी खरी वाटावी असेच चित्र गोमेकॉत होते. ते बदलण्याचे आणि हे इस्पितळ सर्वाभिमुख करण्याचे आव्हान आरोग्यमंत्र्यांनी बऱ्यापैकी पेलले आहे. त्यांनी टोकन पद्धती लागू करून सगळा गोंधळ संपवून टाकला आहे.

कोणताही रुग्ण बाह्यरुग्ण म्हणून गोमेकॉत तपासणीसाठी जाणार असेल तर त्याने सोबत निवडणूक ओळखपत्र किंवा वाहनचालक परवाना नेणे गरजेचे आहे. ही कागदपत्रे बाह्यरुग्ण केंद्र १ जवळ असलेल्या काऊंटरवर दाखवावी लागतात.

Goa Medical College
Super Blue Moon: गोव्यात आज पाहता येणार दुर्मिळ सुपर ब्ल्यू मून

ही कागदपत्रे असणे म्हणजे ती व्यक्ती गोमंतकीय आहे हे स्पष्ट होते व तशी नोंद त्यांच्या तपासणीसाठी दिल्या जाणाऱ्या कागदांवर केली जाते. ती नोंद झाली की कोणत्याही उपचारांसाठी गोमेकॉत पैसे आकारले जात नाहीत.

गोव्यातील पत्ता नोंद असलेली ही कागदपत्रे नसल्यास तो रुग्ण राज्याबाहेरील समजला जातो आणि त्याच्याकडून उपचारांसाठी काही पैसे घेतले जातात. मोठ्या उपचारांवेळी त्याला दोन हजार रुपये अनामत ठेवण्यासही सांगितले जाते. खासगी इस्पितळांच्या तुलनेत गोमेकॉत अशा उपचारांचे शुल्क बरेच कमी असल्याने राज्याबाहेरील लोकही गोमेकॉत अशा उपचारांसाठी येतात.

एकदा रुग्णाने या प्रकारे नोंदणी केली की त्याने आपण कोणत्या बाह्यरुग्ण तपासणी केंद्रात जाणार ते सांगायचे असते. तशी कागदावर नोंद केली जाते. त्यानंतर त्या बाह्यरुग्ण तपासणी केंद्रात असलेल्या नोंदणी केंद्रात जाऊन तेथे पुन्हा नोंदणी करावी लागते. तेथे रुग्णाला एक क्रमांक दिला जातो.

त्या केंद्रात तपासणीसाठीची कागदपत्रे जमा करावी लागतात. तेथे सल्लागार डॉक्टर, वरिष्ठ डॉक्टर, निवासी डॉक्टर तपासणी करण्यासाठी उपलब्ध असतात. रुग्णाने आपण कोणाकडून तपासणी करवून घेणार ते सांगावे लागते. ते डॉक्टर त्यावेळी रुग्णसंख्या जास्त असल्याने उपलब्ध नसल्यास दुसऱ्या डॉक्टराचा पर्याय रुग्णाला दिला जातो.

त्यानंतर तेथील सुरक्षारक्षक क्रमांक पुकारून रुग्णाला तपासणीसाठी बोलावतात. या सगळ्या ठिकाणी शिस्तबद्ध रांगा असतात. मुख्य नोंदणी कक्षाजवळ पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. आता मुलांसाठीही वेगळा कक्ष सुरू होणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी मोठी रांग लागत नाही.

लोक विभागून गेल्याने गोंधळही होत नाही. गोमेकॉमध्ये विविध वैद्यकीय शाखांवर उपचार उपलब्ध आहेत आणि तज्ज्ञ डॉक्टर आहेत. तरी या इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागांपासूनच भोंगळ कारभाराला सुरूवात होत असे.

रुग्णांना केसपेपर बनवण्यासाठी तर दिव्यच करावे लागायचे. शिवाय पुन्हा ज्या विभागाच्या ओपीडीत जायचे असेल, तेथे टोकन मिळवण्यासाठी आणखी एक दिव्य करावे लागत असे.

दररोज येतात हजारोंच्‍या संख्‍येने रुग्‍ण

गोमेकॉत दररोज हजारो रुग्ण राज्याच्या कानाकोपऱ्यांतून तसेच शेजारच्‍या राज्‍यांतून येतात. प्रत्येक विभागातील एक डॉक्टर जिल्हा इस्पितळात महिनाभरासाठी सेवा बजावतो. तेथील रुग्णही नंतर पुढील उपचारांसाठी गोमेकॉत येतात.

त्या सगळ्यांचे व्यवस्थापन करून कोठेही गडबड गोंधळ होऊ देऊ नये हे एक दिव्यच असते. ते गोमेकॉच्या प्रशासनाला दररोज पार करावे लागते. टोकन पद्धतीमुळे आपल्यामागून आलेला रुग्ण पुढे गेला असा अनुभव कोणत्याही रुग्णाला येत नाही.

गोमेकॉ हे नावच विश्‍‍वासाचे बनल्याने दररोज येणाऱ्या बाह्यरुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे व ती यापुढे वाढतच जाणार आहे. त्यातून सर्वांचे समाधान करणारी सेवा गोमेकॉत मिळत आली आहे आणि मिळत राहणार आहे. योग्य अशा व्यवस्थापनाद्वारे हे शक्य होत आहे.

फोनवरून करता येते पूर्वनोंदणी

साधी रुग्णनोंदणीही संगणकीकृत करून यातील सर्व समस्या सोडविण्यात आल्या आहेत. आता तर फोनवरून एक दिवस आधी बाह्यरुग्ण तपासणी केंद्रातील टोकन क्रमांक घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे त्‍या दिवशी तपासणीला प्राधान्य मिळते.

केसपेपर बनविण्याच्या एकाच टप्प्यात रुग्णांना त्यांना हव्या त्या विभागाचा क्रमशः टोकन मिळू शकेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. टोकनवर डॉक्टरांना भेटण्याची निश्‍चित वेळही नमूद करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येत आहे.

त्यामुळे तासन्‌तास प्रतीक्षा करणे टळणार आहे. राज्‍याच्‍या ग्रामीण भागातील तसेच शेजारच्‍या राज्‍यातील काही रुग्‍ण तर आदल्‍या दिवशीच येऊन गोमेेकॉत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटे रांगेत उभे राहायचे. हा त्रास वाचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com