Bicholim: केंद्र सरकारची ''हर घर जल'' योजना शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा होत असला, तरी अजूनही ही योजना प्रामुख्याने गरजवंतांच्या घरापर्यंत पोचलेली नाही. याला सरकारी यंत्रणा तेवढीच जनतेची अनास्थाही कारणीभूत असू शकते. ''हर घर जल'' ही केंद्र सरकारची चांगली योजना असली, तरी डिचोलीतील अजूनही अनेकजण या योजनेचा लाभ मिळण्यापासून बरेच लांब आहेत.
या योजनेचा लाभ सोडाच आजही डिचोलीतील काही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी होत, वणवण फिरून पाणी मिळवले जाते, ही वस्तुस्थिती आहे. कुडचिरे, म्हावळींगे, खरपाल, पैरा आदी ग्रामीण भागात आजही पाण्याची समस्या आहे. उपरोक्त योजनेंतर्गत ज्यांनी अर्ज केले होते. त्या सर्वांना नळ जोडणी मिळालेली आहे, अशी माहिती काही माजी सरपंचांकडून मिळाली आहे.
नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध आणि सुरक्षित पाण्याची उपलब्धता व्हावी. यासाठी जल जीवन मिशन उपक्रमांतर्गत केंद्र सरकारने ''हर घर जल'' योजना पुढे आणली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घटकाला या योजनेचा लाभ मिळण्याचे लक्ष्य निश्चित केले या योजनेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 3.5 लाख कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. ही योजना म्हणजे भविष्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचा निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे.
ग्रामीण भागातला प्रश्न कायम-
पडोसे आणि बार्देश तालुक्यात येणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर डिचोली तालुक्याची तहान भागत असते. तालुक्यातील डिचोली आणि साखळी परिसरातील अधिकाधिक जनता पडोसे प्रकल्पातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. कुडचिरे, म्हावळींगे, खरपाल, पैरा आदी ग्रामीण भागात आजही पाण्याची समस्या आहे. साळ गावही पाणी समस्येने व्याकूळ आहे. नळांना पाणीच येत नाही.
काशिनाथ मयेकर, नागरिक मये-
''हर घर जल'' ही योजना अजूनही काही घरांनी पोचलेली नाही. पैरा-मये, कुडचिरे, तळेवाडा-पाळी आदी काही भागात बऱ्याचदा पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. आजही काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
भागो भैरू वरक, पंच, कुडचिरे-
कुडचिरेतील धनगर वाड्यावरील सर्व धनगर बांधवांना ''हर घर जल'' योजनेचा लाभ मिळालेला आहे. ज्या लोकांनी अर्ज केले नाहीत. त्यांच्यापर्यंत ही योजना पोचलेली नसावी. आता आपण यात लक्ष घालून वंचितांना नळ जोडणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.