खरी कुजबुज: गोविंदराव, स्वतःला आवरा

Khari Kujbuj Political Satire: कृषिमंत्री रवी नाईक हे कधी काय बोलतील हे सांगणे कठीणच, पण त्यांच्या प्रत्येक वाक्याला, शब्दाला संदर्भ असतो हेही तेवढेच खरे आणि तो संदर्भ लावताना भल्याभल्यांची भंबेरी उडत असते.
Khari Kujbuj
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

गोविंदराव, स्वतःला आवरा

बिरसा मुंडा जयंती निमित्ताने जो कार्यक्रम वा जनजाती गौरव रॅली झाली, त्यामुळे एसटीचे गोव्यातील प्रबळ नेते गोविंद गावडे व रमेश तवडकर यांच्यातील वाद आणखी विस्तारला की काय अशी चिंता सर्वसाधारण एसटी बांधवांना वाटू लागली आहे. तशातही सभापतिपदी असलेले रमेश तवडकर हे संयम बाळगून बोलताना दिसत आहेत, तर मंत्री गोविंद गावडे मात्र उघडपणे बोलून वाद वाढवीत आहेत. त्यांना आवर घालण्यात भाजपवालेही कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. या दोघांच्या भांडणाचा सरकारवर परिणाम होत असला तरी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो असे दिसत आहे. सध्याचे वातावरण पाहिले, तर गोविंद गावडे यांची बाजू लुळी पडताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचे हितचिंतक गोविंद गावडे यांनी आपल्या तोंडाला आवर घालणे राजकीयदृष्ट्या त्यांच्या हिताचे असल्याचे म्हणू लागले असले तरी ते त्यांना तोंडावर सांगण्याचे धाडस म्हणे कोणी दाखवत नाहीत. त्यामुळे हा वाद चिघळत राहिला, तर त्यात एसटी चळवळ कमकुवत होईल असे अनेकांना वाटू लागले आहे. त्यांच्या बेताल बोलण्यामुळे युवक त्यांच्यापासून दुरावणार तर नाहीत ना असे प्रकाश वेळीपबरोबर वावरणाऱ्यांनाही वाटते व त्यासाठीच वेळीप यांनी या दोन्ही नेत्यांत समेट घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत दिले आहेत. पण अशा समेटासाठी गोविंदरावांना काही काळ तरी तोंड बंद ठेवायला हवे ना. ∙∙∙

रवींची ‘गॉड मदर’

कृषिमंत्री रवी नाईक हे कधी काय बोलतील हे सांगणे कठीणच, पण त्यांच्या प्रत्येक वाक्याला, शब्दाला संदर्भ असतो हेही तेवढेच खरे आणि तो संदर्भ लावताना भल्याभल्यांची भंबेरी उडत असते. परवा ‘कॅश फॉर जॉब’बाबत बोलताना त्यांनी या प्रकरणामागे असलेल्या गॉड फादर, गॉड मदर सर्वांवर कारवाई होईल, असे उद्‍गार काढले. आता हाच त्यांचा ‘गॉड मदर’ शब्द सध्या फोंड्यात चर्चेचा विषय ठरला आहे. रवी हे एका दगडात अनेक पक्षी मारणारे म्हणून ओळखले जातात. आता या ‘गॉड मदर’ शब्दाद्वारे त्यांनी किती पक्षी मारले आहेत याचा सध्या शोध सुरू झाला आहे. त्यावर विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यातून काय बाहेर निघायचं असेल ते निघेलच, पण लोकनायक या त्यांच्या सध्या गाजत असलेल्या गाण्याच्या चित्रफितीबरोबर आता त्यांची ‘गॉड मदर’ही गाजायला सुरवात झाली आहे, एवढे मात्र नक्की. ∙∙∙

सहकारमंत्र्यांसाठी डोकेदुखी...

राज्यातील एनपीएमुळे बुडणाऱ्या बँका आणि पतसंस्था तसेच डबघाईला आलेल्या डेअऱ्या ही खरे म्हणजे सहकारमंत्र्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली असल्याचे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर जाहीररीत्या म्हणाले. आता राज्यात खरी म्हणजे एकच मोठी दूध डेअरी आहे आणि या डेअरीचा आत्तापर्यंतचा कारभार नेमका कशाप्रकारे चालतो, ते सर्वांना माहीत आहे. फक्त आत्ताच्या प्रशासकीय समितीने काहीअंशी ही डेअरी सावरली आहे, तरीही बुडीत खाती काही कमी होत नाहीत. त्यामुळेच तर गोवा डेअरी सहकारमंत्र्यांना डोकेदुखी ठरत तर नाही ना? असा प्रश्‍न उपस्थितांना नक्कीच पडला असेल. ∙∙∙

प्रवक्ते हरवले

भाजपचे प्रवक्ते ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावर मौन धरून आहेत. आठ दिवसांत अनेक घडामोडी घडल्या, तरी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यामुळे ‘प्रवक्ते हरवले’ अशी चर्चा आहे. या प्रकरणावर त्यांच्याकडे उत्तर नसावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. भाजपचे प्रवक्ते, जे सामान्यतः विरोधकांच्या प्रत्येक दाव्याला तत्काळ उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावर त्यांनी मौन पाळले आहे. या प्रकरणात आठ दिवसांत अनेक नवीन खुलासे झाले आहेत, तरीही प्रवक्ते यावर भाष्य करण्यास टाळत आहेत. यामुळे ‘प्रवक्ते हरवले’ अशी चर्चा उफाळून आली आहे. हे मौन प्रवक्त्यांकडे या प्रकरणाचे उत्तर नसावे असा संशय निर्माण करत आहे.∙∙∙

कोमुनिदादच्या निवडणुकीला चढतोय रंग

पूर्वजांची विरासत सांभाळणे हे आपले कर्तव्य असे प्रत्येकाने समजले असते, तर आज आपल्यावर आज जी परिस्थिती आली आहे ती आलीच नसती. आपल्या राज्यातील सगळ्यात जुनी अशी सहकारी संस्था म्हणजे कोमुनिदाद संस्था. गावातील शेतजमीन, गावातील डोंगर, गुरांना चरण्याची कुरणे कोमुनिदाद संस्थेच्या मालकीची. कोमुनिदाद संस्थेच्या सदस्यांनी निवडून दिलेली समिती व सरकारच्या महसूल खात्याचे अधिकारी मिळून या संस्था चालवितात. आज या संस्था कंगाल बनल्या आहेत. या संस्थांच्या मालकीच्या हजारो एकर जमिनी आहेत. म्हणून या संस्था ताब्यात घेण्यासाठी आता तयारी सुरू झाली आहे. ८ डिसेंबर ते १९ जानेवारीपर्यंत या कोमुनिदाद संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत उतरण्यासाठी अनेक तरुण डोक्याला बाशिंग बांधून सज्ज झाले आहेत. सदस्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी इच्छुकांच्या पार्ट्या व गेट टुगेदर सुरू झाले आहे. सासष्टीपासून काणकोणपर्यंत कोमुनिदाद संस्थांचे सदस्य नवीन मंडळ निवडण्यास सज्ज झाले आहेत. ∙∙∙

डीजीपींची मडगाव भेट

डीजीपी आलोककुमार यांनी नुकतीच मडगावातील दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयाला भेट दिली. त्यांनी या भेटीत एकंदर व्यवस्थेचा म्हणे आढावा घेतला, पण सध्या सरकारी नोकरी विक्रीचे वादळ उठले आहे. त्याचे अधिक प्रमाण दक्षिण गोव्यात असल्याने डीजीपींच्या मडगाव भेटीकडे त्यादृष्टीनेही पाहिले जाते. त्यांनी या तपासासंदर्भात म्हणे दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे चर्चा केली तसेच त्यांना मार्गदर्शनही केले, पण सरकारी सूत्रांनी मात्र त्यासंदर्भात बोलण्याचे टाळले. म्हणूनच त्याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. पण त्यानंतर डीजीपी मालभाटमध्ये गेले व त्यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया विस्फारल्या. कारण नोकरी घोटाळा प्रकाराची परिणती महाराष्ट्रातील निवडणुका आटोपताच मोठ्या राजकीय घडामोडीत होईल अशी जोरदार चर्चा सध्या सुरू असून डीजीपींच्या मालभाट भेटीला राजकीय गोटांत महत्त्व दिले जात आहे. बाबांच्या समर्थकांची छाती तर त्यामुळे फुगलेली असून ते बाबांकडे लवकरच महत्त्वाची जबाबदारी येऊ शकते असे खासगीत एकमेकांकडे बोलताना दिसत आहेत. ∙∙∙

खरेच सरकार तत्त्व पाळणार?

भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जमीन व जंगल या तत्त्वावर इंग्रज व सावकारांविरुद्ध युद्ध पुकारले. राज्यात वन हक्क कायद्याखाली व अनेक दावे बारा तालुक्यात प्रलंबित आहेत त्यात ऐंशी‌ टक्के दावे अनुसूचित जमातीचे आहेत. आदिवासी कल्याण खात्याच्या निधीचा म्हणजे लोकांच्या करातून मिळविलेला महसूल भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी खर्च करण्यात आला. मात्र, आदिवासी समाजाचे वन हक्क दावे त्वरित निकालात काढल्यास तो खरा आदिवासी समाजाच्या जमीन, जल व जंगल यासाठी आयुष्यभर लढलेल्या बिरसा मुंडा यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे आदिवासी समाजातील नागरिक बोलू लागले आहेत. ∙∙∙

क्रुझचे ‘मिशन गोवा बचाव’

‘अति तिथे माती’ अशी एक म्हण आहे. आपण गोव्यात धनाच्या लोभासाठी हेच केले आणि परिणाम आज आपण भोगत आहोत. खान उद्योगात अती केली आणि आज त्याची माती झाली. रेती उपसा अती केली, परिणाम रेती उपशावर बंदी आली. पर्यटन उद्योगात कॅसिनो, वेश्या व्यवसाय, ड्रग पेडलिंग व सनबर्नसारख्या गैरकारभाराला चालना दिली, परिणाम गोवा बदनाम झाला. आता राहिलेल्या गोव्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते व वेळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी ‘मिशन गोवा बचाव’ सुरू केले आहे. गोव्याला नवीन प्रादेशिक आराखडा हवाय व गोवा वाचायला हवा यासाठी क्रुझ आग्रही आहेत. क्रुझबाब या मिशनची सुरवात आपण आपल्या शेजारील मतदारसंघातील चांदर पंचायत क्षेत्रात मोठा जमीन घोटाळा झाला आहे, त्यातून करावी अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com