
Vishwajit Rane announces new hospital in Madkai
फोंडा: राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य असून आरोग्य खात्यातर्फे आता विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. मडकईत येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुसज्ज असे इस्पितळ उभारणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली.
मडकई आरोग्य केंद्रात शनिवारी (ता.१५) आरोग्य खात्यातर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनानंतर विश्वजीत राणे बोलत होते. या शिबिराच्या उद्घाटन समारंभाला व्यासपीठावर मडकईचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आरोग्य खात्याच्या संचालिका रूपा नाईक, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, दंत महाविद्यालयाच्या डीन डॉ. आयडा आताईद तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष जल्मी आदी उपस्थित होते.
विश्वजीत राणे म्हणाले की, आरोग्य खात्यांतर्गत आता मोठे बदल करण्यात आले आहेत. ‘जनतेच्या दारी आरोग्य सेवा’ ही संकल्पना राबवली जात असून आतापर्यंत नऊ भव्य आरोग्य शिबिरे विविध मतदारसंघात घेण्यात आली. ही शिबिरे सुरूच राहणार असून सर्वसामान्य नागरिकाला आरोग्याच्या समस्यांविषयी दिलासा देण्यासाठी आरोग्य खाते सजग झाले आहे. एखाद्याच्या कुटुंबात दुर्धर आजार झाल्यानंतर त्या कुटुंबाला होणारा मनस्ताप आपण अनुभवला आहे, त्यामुळेच आता आरोग्य खात्याकडून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी असे विविध उपक्रम आखण्याबरोबरच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, आरोग्य हीच धनसंपदा आहे, असे मानून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यायला हवी. मडकई मतदारसंघात स्तन कर्करोगाची तपासणी शिबिरे आयोजित केली, त्यात काही रुग्ण सापडले. त्यामुळे महिलांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून राज्यातील नागरिकांना आरोग्याच्याबाबतीत अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत, त्यांचे हे प्रयत्न प्रशंसनीय असे असून सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याने प्रत्येकाने आरोग्य खात्याच्या उपक्रमांना सहकार्य करावे.
सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी तर डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी आभार मानले. या आरोग्य शिबिरात तपासणी करण्यासाठी मडकई मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तब्बल बत्तीस डॉक्टर आरोग्य खात्याने रुग्णांच्या तपासणीसाठी सज्ज ठेवले होते.
राज्यात मगो आणि भाजपची युती अभेद्य राहणार असून पुढील निवडणूकही ही युतीच लढवणार आहे. या युतीच्या माध्यमातून राज्यात खूप चांगले उपक्रम साकारले जात आहेत. सुदिन ढवळीकर यांनी आतापर्यंत हाती घेतलेल्या प्रत्येक खात्याला न्याय दिला असून ते आमदार म्हणून लाभले हे मडकईवासीयांचे भाग्यच असल्याचे उद्गार विश्वजीत राणे यांनी काढले.
मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर आणि आपल्या कुटुंबाचे संबंध घरोब्याचे असून सुदिन ढवळीकर हे आपले मित्र नसून आपले बंधूच आहेत. आपण लहान होतो त्यावेळेपासून सुदिनना पाहत असून एखाद्या कामाच्या मागे लागून ते काम कसे करून घ्यावे, हे सुदिन ढवळीकर यांना बऱ्यापैकी माहीत आहे, म्हणूनच तर त्यांना केंद्रातही मान असल्याचे विश्वजीत राणे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.