गोमंतक भंडारी समाजाचे सध्या अस्तित्वात असलेले कार्यकारी मंडळ हे बेकायदेशीर असून त्यांचा कार्यकाळ 2021 मध्येच संपला आहे. शिवाय न्यायालयाने फटकारलेले असतानाही या कार्यकारिणी समितीकडून अनेक घटनाबाह्य कृती सुरूच आहेत.
त्यांनी मडगावात आयोजित केलेली आमसभाही बेकायदेशीर होती, असा आरोप समाजाचे माजी महासचिव उपेंद्र गावकर यांनी केला आहे.
आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुदेश किनळेकर, संदीप पेडणेकर, सुनिल सांतीनेजकर, महेश शिरगावकर आणि शैलेश नाईक उपस्थित होते.
गावकर म्हणाले, गोमंतक भंडारी समाजाच्या घटनेनुसार निवडून आलेल्या प्रत्येक कार्यकारिणी समितीला ३ वर्षे कारभार करता येतो. सत्तेवर राहता येते.
सध्याची कार्यकारिणी समिती २५ नोव्हेंबर २०१८ रोजी अस्तित्वात आली असून त्यांचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संपला आहे. असे असतानाही २९ ऑगस्ट २०२१ रोजी सध्याच्या कार्यकारिणी समितीने ऑनलाइन आमसभा घेत त्यांच्या कार्यकारिणी समितीला ३ वर्षांची मुदतवाढ दिली हे बेकायदेशीर होते.
अजून ‘ऑडिट’ नाही
सध्याच्या बेकायदेशीर कार्यकारणी समितीने अनेक बाबी घटनाबाह्य केल्या असून विजया बँकेमध्ये उघडण्यात आलेले खातेही बेकायदेशीर आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घडामोडी चालू आहेत.
शिवाय या सर्व व्यवहारांचा गेली दोन वर्षापासून ऑडिट झालेले नाही, असा आरोपी गावकर यांनी केला आहे. सध्या समाजाचे ३,९६० सदस्य आहेत.
सध्याच्या कार्यकारणी समितीने २०१८ च्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या कृष्णकांत गोवेकर यांना सचिवपदी नेमले आहे, हेही घटनाबाह्य आहे.
मडगावातील आमसभा बेकायदेशीर
१० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मडगाव येथे समाजाची आमसभा बोलावली आहे. ही आमसभा बेकायदेशीर असून या विरोधात आम्ही योग्यवेळी कायदेशीर कृती करणार आहोत, असेही उपेंद्र गावकर यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.