Gomantak Bhandari Samaj Annual Meeting
वास्को: अखिल गोमंतक भंडारी समाजाच्या विद्यमान समितीने वास्कोत बोलाविलेल्या आमसभेवेळी प्रचंड गदारोळ झाल्याने ही सभा अवघ्या साडेचार मिनिटांतच गुंडाळली. विरोधी गटाच्या २३२ जणांनी व्यासपीठाचा ताबा घेऊन पुढे दोन तास सभा चालविली. सभा सुरू होण्यापूर्वी पोलिस उपस्थितीत आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. विरोधी गटाने अस्थायी समिती स्थापन करून मंगळवारी बैठक बोलाविली आहे.
या आमसभेत वार्षिक अहवाल, जमा-खर्च सादर करून समाजाची निवडणूक १७ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, विरोधी गटाने या निवडणूक प्रक्रियेला तसेच विद्यमान समितीने आमसभेत मांडलेल्या ठरावांना तीव्र विरोध दर्शविला. अखेर दुसऱ्या समितीने आमसभा पुढे नेत बाराही तालुक्यांत पर्यायी समिती जाहीर करून प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या आमसभेत पोलिसांना बोलाविल्याने ज्ञातीबांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अखिल गोमंतक भंडारी समाजाची आमसभा मांगोरहील येथील कोमुनिदाद सभागृहात आज झाली. यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, उपाध्यक्ष देवानंद नाईक, सचिव फक्रू पणजीकर, खजिनदार जोगुसो नाईक, सहसचिव सुनील नाईक, सदस्य अवधूत नाईक, प्रकाश कळंगुटकर, एकनाथ तारी, महिला अध्यक्ष संध्या पालयेकर आणि कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यमान समितीने पत्रकार परिषदेत सांगितले की, ही आमसभा कायद्यानुसार पार पडली असून सर्व ठराव लोकशाही पद्धतीने मांडले. दुसऱ्या गटाने आमसभा सुरू असताना मुद्दाम गोंधळ घालून सभेत अडथळा निर्माण केला. अखिल गोमंतक भंडारी समाजाची निवडणूक १७ नोव्हेंबर रोजी निश्चित केली असून, दुसऱ्या गटाने केलेले आरोप विद्यमान समितीने फेटाळून लावले.
अशोक नाईक यांना यापूर्वी पणजीत बोलावलेल्या तालुका समित्यांच्या बैठकीतून निवडणूक कधी घेणार, या मुद्यावर काढता पाय घ्यावा लागला होता. आज निवडणूक तारीख जाहीर करूनही त्यांना तसेच वागावे लागले.
आम्ही ही आमसभा घटनेनुसार घेतली; परंतु दुसऱ्या गटाने आमसभा सुरू होण्यापूर्वीच सभेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. विद्यमान समितीने कायद्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी निवडणूक घोषित केली आहे.
अशोक नाईक, अध्यक्ष, भंडारी समाज
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.