Goamantak Bhandari Samaj Elections
पणजी: राज्यातील इतर मागासवर्गीयांपैकी सर्वांत मोठा समाज असलेल्या भंडारी समाज संघटनेचा निवडणूक विषय सध्या बराच चर्चेत आहे. भंडारी समाजासाठी सोमवार (ता. ४) अत्यंत महत्त्वाचा असून तीन घडामोडी या दिवशी घडणार आहेत. त्याकडे तमाम समाज बांधवांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
याआधी जिल्हा निबंधकांनी अशोक नाईक यांच्या समितीला बेकायदेशीर ठरवत सरकारने प्रशासक नेमण्याचा आदेश दिला होता. त्याला नाईक यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावेळी जिल्हा निबंधकांनी जारी केलेल्या नोटीशीतील त्रुटींमुळे ती प्रक्रिया पुन्हा करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. आता पुन्हा ती प्रक्रिया सुरू केली असून सोमवारी जिल्हा निबंधक नाईक यांच्या समितीविरोधात कोणता निर्णय देतात, याकडे समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.
भंडारी समाजाची निवडणूक सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. देवानंद नाईक आणि त्यांच्या १३ साथीदारांनी मिळून समाजाच्या संविधानाच्या नियमांचे उल्लंघन करून निवडणूक प्रक्रियेत अनियमितता केल्याचे गंभीर आरोप आहेत. या सर्व सदस्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे, आणि देवानंद नाईक यांनी आपल्या मावस भावाला, रामदास पेडणेकर यांना निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले आहे. ही नेमणूक फक्त निवडणुकीत इतर उमेदवारांना अपात्र ठरविण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी केली आहे.
या अवैध कृतींविरोधात न्याय मिळविण्यासाठी आम्ही न्यायालयाकडे धाव घेतली आहे. भंडारी समाजाच्या निवडणुकीतील या अनियमितता रोखण्यासाठी प्रत्येक समाज बांधवाने जागरूक राहून विरोध केला पाहिजे. लोकशाही प्रक्रिया अबाधित ठेवण्यासाठी आणि समाजहितासाठी ही निवडणूक निष्पक्षपातीपणे पार पडणे अत्यावश्यक आहे. देवानंद नाईक आणि त्यांच्या गटाच्या बिनविरोध निवडीचा डाव उधळून लावण्यासाठी आम्ही लढा सुरू ठेवणार आहोत. समाजाच्या प्रत्येक सदस्याचा हक्क आणि प्रतिष्ठा कायम राखण्याचा प्रयत्न करू, असे ॲड. बकाल म्हणाले.
संस्थेचे सरचिटणीस उपेंद्र गावकर यांनी बोलावलेल्या आमसभेला अध्यक्ष अशोक नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडून स्थगिती मिळविली. त्याला गावकर यांनी म्हापसा जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले असून सोमवारी त्यांच्या याचिकेवर अंतिम सुनावणी होणार आहे.
संस्थेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी आहे.
त्याशिवाय संस्था जिल्हा निबंधकांकडे समितीने घेतलेल्या मुदतवाढीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सोमवारीच होणार आहे.
ॲड. अनिश बकाल यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीसाठी उमेदवार अपात्र ठरविण्यासाठी मनमानी निकष लादले आहेत. यात ५० वर्षांपेक्षा कमी वय, आंतरजातीय विवाह आणि इतर कारणांचा समावेश आहे. हे नियम केवळ विरोधकांना बाजूला काढून देवानंद नाईक आणि त्यांच्या गटातील उमेदवारांना बिनविरोध निवडून देण्यासाठी बनविले आहेत.
संघटनेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवाराने तीन वार्षिक सभांना उपस्थिती लावलेली असली पाहिजे.
उमेदवाराचे वय पन्नाशीच्या पुढे असले पाहिजे
उमेदवाराने धर्म, जातीबाहेर विवाह केलेला नसावा, अशा जाचक अटी असल्याने अनेक तरुणांचे अर्ज बाद ठरण्याची शक्यता आहे.
त्यावरूनही वाद होण्याची शक्यता आहे.
देवानंद नाईक आणि त्यांच्या गटाने निवडणूक यादीतून काही समाज सदस्यांची नावे हटविली आहेत, जे निवडणुकीसाठी उभे राहणार होते. ही नावे काढण्यामागे कोणताही कायदेशीर आधार नसून, केवळ देवानंद नाईक यांच्या गटाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी हा कट रचला आहे.
ॲड. अनिश बकाल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.