Goa State Tree Terminalia Eliptica: माडत हा वृक्ष गोव्याचा राज्य वृक्ष आहे. Terminalia Eliptica हे या वृक्षाचे शास्त्रीय नाव. मराठीत त्याला आईन असे म्हणतात. माडत हे स्थानिक नाव आहे. कोकणात आणि गोव्यात हा वृक्ष माडत म्हणून ओळखला जातो.
काही ठिकाणी या वृक्षाला माट्टी असेही म्हणतात. हा वृक्ष अत्यंत वैशिष्ट्यपुर्ण आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गोव्याच्या या राज्य वृक्षाची खासियत जाणून घेऊया...
गोव्याचे 2 राज्य वृक्ष
गोव्याचा राज्य वृक्ष माडत बाबत बोलताना पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर म्हणाले की, माडत हा वृक्ष आधीपासून गोव्याचा राज्य वृक्ष आहे. तथापि, मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रीमंडळातील गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी माड हा राज्य वृक्ष करा, अशी मागणी केली होती.
सरकारनेही तसे ठरवून माडतचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण गोव्यातील पर्यावरणवाद्यांनी सरकारला माडत वृक्षाचे महत्व पटवून दिले.
केरकर म्हणाले, हजारो वर्षांपासून गोव्यात माडत आहे. माड हा मूळचा गोव्याचा नाही. तो प्रशांत महासागर परिसरातून आलेला आहे. माड इकडे लावला जातो. पण माडत हा इथला मूळ वृक्ष आहे. तो जंगलाचे प्रतिनिधित्व करणारा वृक्ष आहे.
गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात या वृक्षाला महत्वाचे स्थान आहे. गणेश चतुर्थी काळात माडत वृक्षाची फुले ज्यांना माटोळी म्हटले जाते. ती आरास करण्यासाठी वापरली जातात. या फुलांच्या सहाय्याने घरातील गणेशाचा मंडप अलंकृत केला जातो.
ज्या ज्या ठिकाणी माडत वृक्ष असतो ते त्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे, याचे द्योतक असतो.
माडतच्या पानांचे खत
दरम्यान, पुर्वीच्या काळी लोकं पाऊस आला की चर खणायचे आणि त्यात विशेषतः माडत वृक्षाची पाने टाकत असत. त्यात कंद टाकत असत. त्याला अळूमाडी म्हणतात. अळुमाडीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात येण्यात माडत वृक्षाच्या पानांचे खत कारणीभूत ठरायचे.
आलं, हळद किंवा इतर काही पिकांसाठी खत म्हणून या वृक्षाचा पाला वापरला जायचा.
सुसोगड पर्वत परिसरात माडत
माडत हा वृक्ष गोव्यात सगळीकडे पाहायला मिळायचा. पण जंगलाचा ऱ्हास झाला, तसे हे वृक्षही कमी होत गेले. आता जिथे जंगली वृक्ष असतील, समृद्ध वनसंपदा असेल तिथे हा वृक्ष असतो. गोव्यात पेडण्यापासून काणकोणपर्यंत विपुल वनसंपदा असलेल्या ठिकाणी, जंगलात हा वृक्ष हमखास पाहायला मिळतो.
गोवा आणि कोकणातील सर्वात उंच पर्वत आहे सुसोगड. त्याची उंची 1027 मीटर इतकी आहे. तिथे हे वृक्ष पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेला शेकरू देखील या झाडावर आढळून येतो, असेही केरकर यांनी सांगितले.
पाणी साठवण्याची क्षमता
मगरीच्या पाठीसारखा या झाडाचा बुंधा असतो. त्यामुळे या झाडाला इंग्रजीमध्ये क्रोकोडाईल बार्क ट्री असेही म्हणतात. या झाडाच्या बुंध्यात पाणी साठवले जाते. ही या झाडाची क्षमता आहे. जगभरातील अनेक झाडांमध्ये तशी क्षमता आहे. हे झाड देखील काही प्रमाणात पाणी साठवते.
तीव्र उन्हाळ्यात बरीच झाडे शुष्क होत असतात. हे झाड स्वतःमध्ये पाणी साठवून स्वतःसह इतर वनस्पतींनाही गारवा देण्याचे, तापमान नियंत्रित करण्याचे काम करते. या झाडांवर मोठ्या प्रमाणात फुलपाखरे, कृमी, किटक यांना सहारा मिळतो.
या झाडात पाणी असल्यानेच हे होते. हे निसर्गाची किमिया आहे. निसर्ग वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळी वैशिष्ट्ये प्रदान करत असतो. त्यातून ही झाडे त्यांच्या आजुबाजूच्या परिसंस्थेला फायदेशीर ठरत असतात.
इतरही वापर
माडत झाडाचे इतरही अनेक फायदे आहेत. सौंदर्य प्रसाधाने आणि इसेन्स बनविण्यासाठीही या झाडाचा वापर केला जातो. या झाडाची साल अग्निरोधक असते. ती सहसा लवकर जळत नाही. जहाज बांधणीसाठी या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो.
तसेच रेल्वेच्या रूळांमध्ये आडवे लाकडी पाट टाकले जातात त्यासाठी देखील या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो. फर्निचर, सुतार कामात या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.