पर्यटनस्थळ म्हणून सुप्रसिद्ध असलेले आगोंद गावचे प्रवेशद्वार, दुमाणे ते केरीपर्यंतच्या पथदीपांचे उद्घाटन करण्यात येत आहे. पावसाळी विधानसभा अधिवेशनात काणकोणातील एकूण २२ प्रकल्पांसाठी ६० कोटी रुपये मंजूर करण्यात सभापती असल्यानेच फायदा झाला. नागरिकांनी सकारात्मकता दाखवावी, त्यामुळे विकासाला गती मिळेल, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.
दुमाणे ते केरी-आगोंद येथील रखडलेल्या पथदीपांचे बुधवार, ४ रोजी उद्घाटन केल्यानंतर सभापती तवडकर बोलत होते. यावेळी पंचसदस्य फातिमा रॉड्रिग्स, केनिशा फर्नांडिस, स्थानिक शाबा नाईक गावकर, नारायण देसाई, विनोद फळदेसाई, रामदास सावंत, पुरुषोत्तम नाईक गावकर, स्टीवी रॉड्रिग्स, आल्बर्ट फर्नांडिस, वीज खात्याचे अभियंता गोविंद भट, च्यारी व अन्य उपस्थित होते.
पंचसदस्य रॉड्रिग्स यांनी सभापती तवडकर यांच्या कार्याची स्तुती करून पाणी वितरण व विजेची समस्या सोडविल्याबद्दल धन्यवाद दिले. संतोष लोलयेकर यांनी काणकोण वीज खात्याचे कर्मचारी सदैव चांगले काम करत असल्याचे सांगितले. यावेळी अभियंता गोविंद भट, दत्तानंद च्यारी, तसेच मोतिलाल, रमेश, स्टीवी यांचा खास गौरव सभापतींच्या हस्ते करण्यात आला. गोविंद भट यांनी सभापती व अन्य उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
सभापती रमेश तवडकर म्हणाले की, काणकोणातील रस्त्यांवर एकही खड्डा राहू नये यासाठी येणाऱ्या वर्षभरात सर्व रस्ते गुळगुळीत केले जातील. ७०० कोटी रुपये खर्चून केले जाणारे बेनुर्डे ते काणकोणपर्यंतच्या चौपदरी महामार्गाचे काम येत्या ६ महिन्यांत सुरू होईल. फिल्मसिटी काणकोणातच होईल, त्यामुळे कार्यकर्ता सक्षम होण्यासाठी बळ मिळेल. फिल्मसिटीच्या माध्यमातून काणकोणातील कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. तसेच रोजगारही मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे.
या गावात विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी ६ ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आले आहेत. येथील भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाले असून नोव्हेंबरपर्यंत त्या कार्यान्वित केल्या जातील. समुद्रकिनारी भागात वीजवाहिन्या गंजतात, त्यामुळे त्याठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येतील. पाण्याचे वितरण सुरळीत करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.